संग्रहित फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, तीन दिवसांपुर्वी (दि. २३ फेब्रुवारी) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संदिप हे त्यांच्या मोझेनगर येथील घरी होते. तेव्हा पाच अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात शिरले. त्यांनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगत डोंगरे यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल ताब्यात घेत बळजबरीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. आरोपींनी त्यांना लोहगाव येथील सृष्टी हॉटेलच्या मागील बाजूस नेऊन पुन्हा मारहाण केली. त्यानंतर आरोपी किरण उनवणे हिनेही मारहाण करत डोंगरे यांना कारमध्ये बसण्यास भाग पाडले.
कमरेला लावलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवत, संबंधित महिलांचे पैसे दिले नाहीस तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपींनी डोंगरे यांना बोल्हेगाव येथे नेले. तेथेही त्यांना मारहाण करून पैशांसाठी तगादा लावला. “पैसे दिले नाहीत तर तुझा गेम करून टाकेन,” अशी धमकीही देण्यात आली. या प्रकारातून सुटका झाल्यानंतर डोंगरे यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा ‘मुहूर्त’ ठरला
शिलाई मशिनच्या नावाखाली लाखो उकळले
प्राथमिक चौकशीत डोंगरे मूळचे अहिल्यानगर येथील असून, त्यांनी शिलाई मशीन देण्याच्या नावाखाली काही महिलांकडून लाखो रुपये गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मशीन न देता ते पुण्यात आले होते. डोंगरे यांच्या अपहरणाची माहिती शेजाऱ्यांनी आधीच पोलिसांना दिली होती. मात्र घरी परतल्यानंतर डोंगरे यांनी अपहरण झाले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणाचा पुढील तपास लोहगाव पोलिस करीत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचा एक नातेवाईक अहिल्यानगर येथील स्थानिक नगरसेवक असल्याची प्राथमिक माहिती आहे.






