सावन वैश्य / नवी मुंबई:- पतंजली या आयुर्वेदीक कंपनीच्या नावाने बनावट वेबसाईट बनवत लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलांच्या आजारपणाची माहिती पतंजलीच्या वेबसाईटवर भरून एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. आजारावरील विविध आजारांच्या वेगवेगळ्या पॅकेजचे एकूण 7 लाख 25 हजार 330 रुपये भरून देखील उपचार होत नसल्याने, चेतन पाटील यांनी बनावट पतंजलीच्या वेबपेज चालक मिश्रा यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घणसोलीतील तळवली नाका येथे राहणारे समाजसेवक चेतन रमेश पाटील यांची पतंजलीच्या बनावट वेब पेजवरून, तब्बल सव्वासात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाबा रामदेव यांचे पतंजली कंपनीचे साहित्य हे आयुर्वेदिक असल्याचा दावा बाबा रामदेव यांच्याकडून केला जातो. सध्याच्या युगात देखील आयुर्वेदिक उपचारावर विश्वास ठेवणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लोकांचा कल अशा गोष्टींकडे मोठ्या प्रमाणात असतो.
मात्र याच पतंजलीच्या बनावट वेब पेजने घणसोली तळवली नाका येथील समाजसेवक चेतन पाटील यांची तब्बल 7 लाख 25 हजार 330 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. चेतन पाटील यांनी पतंजलीच्या त्या बनावट पेजवर वडिलांच्या आजारपणाची माहिती भरली असता, मिश्र नावाच्या अज्ञात इसमाने चेतन पाटील यांना फोनवर संपर्क करून विश्वास संपादन केला. आरोपी मिश्रा यांनी चेतन पाटील यांच्या वडिलांसाठी लागणाऱ्या उपचाराचे पॅकेज बाबत माहिती सांगून, वेळोवेळी त्यांच्या जवळून एकूण ७ लाख २५ हजार ३३० रुपये बँकेच्या खात्यावर जमा करून घेतले. मात्र एवढे लाखो रुपये जमा करून देखील वडिलांचे उपचार होत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे कळताच, चेतन पाटील यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन बनावट पतंजली वेब पेजवरील मिश्र नावाच्या अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत.