कौटुंबिक वादातून संतप्त पतीने केला खून
बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढताना दिसत आहे. असे असताना आता तालुक्यातील उटी गावात धक्कादायक घटना घडली. सततच्या वादातून उद्भवलेल्या रागाच्या भरात पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
लक्ष्मी पवन धुंदाळे (वय २४) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, आरोपी तिचा पती पवन गजानन धुंदाळे (वय २८) आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री जळगाव जामोदच्या उटी येथे घडली. पीडितेचे सासरे गजानन धुंदाळे आणि सासू पुष्पा हे रात्री १ वाजता धाव घेत पोलिस-पाटील संदीप गटमणे यांच्या घरी आले व पवनने लक्ष्मीला कुऱ्हाडीने मारले अशी थरारक माहिती दिली. तत्काळ पोलिस पाटील घटनास्थळी पोहोचले असता, लक्ष्मी ही खोलीत गादीवर रक्ताच्या थारोळ्यात निपचित अवस्थेत आढळली. मानेच्या मागील बाजूस खोल जखम होती व गादी पूर्णपणे रक्ताने माखलेली होती.
हेदेखील वाचा : Gadchiroli Crime : वेतन वाढ रोखली, शरीरसुखाची मागणी केली, छळाला कंटाळून परिचारिकेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकरण काय?
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित आरोपी पवन याने हत्या केल्याची कबुली दिली. ‘लक्ष्मी मला नेहमी तू काही कामाचा नाहीस, कुठे जाऊन मर’ असे बोलून अपमान करायची. काल रात्रीही तिने शिवीगाळ केली. रागाच्या भरात मी तिला झोप लागल्यानंतर कुऱ्हाडीने वार केला’, असे पवनने पोलिस पाटील यांना सांगितले. माहिती मिळताच पोलिस, अॅम्बुलन्स आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले.
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, एकतर्फी प्रेमातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. भांडणानंतर मैत्रिणीच्या प्रियकराने त्याच्यावर चाकूने हल्ला करत रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. ही थरारक घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत गाडीखाना परिसरात घडली. अमन मेश्राम (वय २४, रा. गंगाबाई घाट चौक) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.
हेदेखील वाचा : Ahilyanagar News: जामखेड नृत्यांगना आत्महत्या प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचा? BJP–NCP च्या नेत्यांचे एकमेकांकडे बोट






