संग्रहित फोटो
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महंमदवाडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सुरुवातीला तक्रारदारांनी चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने काही रक्कम पाठविली. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याने विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ३८ लाख १० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस मानसिंग पाटील तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेऊ नये, तसेच संदेशांकडे काणाडोळा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा : आधी जोडीने देवदर्शन नंतर घाटामध्ये केला खून; पती पोलिसांत स्वतःहून हजर
डिजीटल ॲरेस्टची भिती दाखवून फसवणूक
सायबर गुन्ह्यात ‘डिजीटल ॲरेस्ट’च्या भितीने अनेकांना गंडविले जात असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल सव्वा कोटींना गंडा घालणाऱ्या सायबर चोराला अटक करण्यात यश मिळविले आहे. या चोरट्याला पनवेलमधून पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून भारतातील पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. मु. पो. कोकबन, ता. रोह, जि. रायगड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत ७८ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिसांत तक्रार दिली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण व त्यांच्या पथकाने केली आहे.