ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचपाार्श्वभूमीवर ठाण्यात पावसामुळे दरड कोसळल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर येथे आज दरड कोसळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे.
या दुर्घटनेत जय मातेरे यांच्या घराचे नुकसान झाले तर परिसरातील चार घरं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पालिकेने तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले. या दुर्घटनेत ७० वर्षीय वृद्ध जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, अतिक्रमण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाने बचावकार्य युद्धपातळीवर केलं.
दरड कोसळली त्या परिसरात पालिकेने नागरिकांच्या रहदारीवर बंदी घातली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही. मात्र खबरदारीच्या दृष्टीने इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास पालिकेने आवाहन केले आहे. या दुर्घटनेबाबत पुढील कार्यवाही लोकमान्य प्रभाग समितीमार्फत सुरू आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दल सतत सज्ज आहे. दरड कोसळल्यानंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, महापालिकेने तातडीने उपाययोजना करत जीवितहानी टळली आहे.
याचबरोबर रामनगर, वागळे इस्टेट, या ठिकाणी देखील रस्त्यावरती लोखंडी कमान कोसळली. घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी १ जेसीबी मशीन सह, अग्निशमन दलाचे जवानांनी ही कोसळलेली लोखंडी कमान बाजूला केली आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत देखील कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पुढील 48 तास ठाणे जिल्हाला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील खाडी आणि नदी / नाला इ. पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षा 022- 25301740 किंवा 9372338827 या क्रमांकावर अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.आज सकाळी 6.30 वाजल्यापासून ते 11.30 पर्यंत म्हणजेच मागील पाच तासात 40 एमएम इतकी ठाण्यात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गरज असेल तरंच घराबाहेर पडा असं आवाहन देखील ठाणेपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे.