सौजन्य - सोशल मिडीया
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात गुन्हेगारी दहशत माजवत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पित असताना पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी चिंचवड येथील ऑरा हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. फिर्यादी सूरज रामदास घोडे (२५, रा. घरकुल, चिखली) यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी आशुतोष सुदाम कदम (२८, रा. घरकुल, चिखली), राजा युवराज हजारे (२८, रा. घरकुल, चिखली) आणि शैलेश शाम गायकवाड उर्फ बन्या (३०, रा. थेरगाव) यांना ताब्यात घेतले आहे.
रविवारी दुपारी फिर्यादी सूरज आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये दारू पित असताना आरोपी तिथे आले. जुन्या भांडणाच्या रागातून आशुतोष कदम याने सूरजला शिवीगाळ करत कानाखाली मारले. त्यानंतर टेबलवरील ग्लास आणि दारूची बाटली उचलून त्याच्या डोक्यात फेकून गंभीर जखमी केले. दरम्यान, सूरजचे मित्र अविनाश, धीरज व गणेश यांनी आशुतोषला पकडले असता, आरोपी राजा हजारे यानेही बिअरची बाटली घेऊन सूरजवर हल्ला केला. त्याचबरोबर राजा आणि शैलेश यांनी टेबलावरील दारूच्या बाटल्या व ग्लास फेकून परिसरात दहशत निर्माण केली. “आम्ही इथले भाई आहोत, तुम्ही आम्हाला ओळखत नाही,” असे धमकावत आरोपींनी गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मध्यस्थी करणार्या ज्येष्ठावर हत्याराने वार
घराबाहेर फिरण्यासाठी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाला येरवड्यातील यशवंतनगर येथील डायमंड चौक येथे तीन ते चार जण आपआपसात वाद घालत असताना दिसले. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करून वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यावरच धारदार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमन अनिल भालेराव (रा. यशवंतनगर येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश रामचंद्र साबळे (६३, रा. डायमंड चौक, यशवंतनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिनांक ३ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.