संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून आत्महत्येच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तरुणाच्या त्रासामुळे एका विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली आहे. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत विवाहित तरुणीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार आरोपी पंकज रवींद्र पाटील, त्याची पत्नी रुपाली (दोघे रा. गोडबोले वस्ती, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहापूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणीची आरोपी पंकज पाटील याच्याशी ओळख झाली होती. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. विवाहानंतर तरुणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. पाटीलने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर पाटीलने तरुणीबरोबर काढलेली छायाचित्रे पाठविली. घटनेनंतर तरुणी मानसिक तणावाखाली होती. पाटील आणि त्याच्या पत्नीच्या त्रासामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या आईने याबाबत तक्रार दिल्यानंतर पाटील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक मिथुन सावंत करत आहेत.
माढ्यात विवाहित महिलेची आत्महत्या
गेल्या काही महिन्याखाली वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना ताजी असतानाच माढ्यातील एका विवाहितेने टोकाचे पाऊल उचललं आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यानी तगादा लावल्यामुळे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दहीवली (ता. माढा) येथील पतीसह सासरे-सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत विवाहितेचे नाव काजल नारायण मिस्किन (वय २५) असे आहे. तिचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. गेल्या चार वर्षांपासून पती नारायण विलास मिस्किन, सासरे विलास रामचंद्र मिस्किन व सासू शोभा विलास मिस्किन (रा. दहीवली, ता. माढा) हे तिला ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ करीत होते.