संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा गुजरातमधील जामनगरचा आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौरव रामप्रताप सविता ( वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई लखन गंगाधर शेटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समर्थ पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंम्बिंग ऑपरेशन राबवले होते. यावेळी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीतील लॉजेस तपासत होते. त्यावेळी एकजण हा रस्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून, त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पोलीस पथक तेथे गेले. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपी तेथून निघून जाऊ लागला.
मात्र त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपये रकमेच्या बनावट नोटा आढळल्या. त्यानुसार पोलिसांनी गौरव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात जन्या वादातून तरुणावर हल्ला; कुर्हाड अन् कोयत्याने सपासप वार
बनावट नोटा छापणाऱ्या चौघांना अटक
दरम्यान गेल्या काही महिन्याखाली वाशिमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगरुळपीर पोलिसांनी आरोपींकडून बनावट नोटा छापण्याचे साहित्य देखील जप्त केले आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे ही घटना घडली आहे. सर्व आरोपी नांदेड येथून कारमधून येत होते. यावेळी मंगरुळपीर पोलिसांनी नाकाबंदी करत गाडीमधील तिन आरोपींना अटक केली आहे. तसेच सर्व साहित्य देखील जप्त केलं आहे. आरोपी 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. तर उर्वरित एका ओरापीला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड येथून बनावट नोटांचा व्यवसाय करणारे तिघेजण कारमधून येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाकाबंदी करण्यात आली आणि सर्व गाड्यांची तपासणी सुरु करण्यात आली. यावेळी एक गाडी समोरून येत होती, त्या गाडीला अडवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला परंतु गाडी थांबली नाही. यानंतर पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर आरोपींनी गाडीचा वेग वाढवला आणि पळून जाण्याचा प्रयत्न सुरू केला. काही अंतर पार केल्यानंतर मंगरुळपीर पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली. यावेळी पोलिसांना कारमधून एका मोठ्या पिशवीत कागदाचे काही बंडल आणि द्रव असे पदार्थ आढळून आले. ज्याचा वापर खोट्या नोटा तयार करण्यासाठी केला जातो. यानंतर तिन्ही आरोपींना मंगरुळपीर पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत हे तिन्ही आरोपी एक लाख रुपयांच्या बनावट नोटा बनवण्याचे साहित्य खरेदी करत असल्याचे समोर आलं. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम बॅगेबाबत अस्पष्ट उत्तरे दिली.