सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : वारजे परिसरात जुन्या वादातून तरुणावर टोळक्याने कोयते तसेच कुर्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत देखील माजवली. दोन दिवसांपुर्वी रात्री साडे आकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भैय्या उर्फ लक्ष्मण शेडगे याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत जुबेर शेख (वय २२) याने तक्रार दिली आहे. हल्यात अक्षय कांबळे (वय २८) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुासर, जुबेर व अक्षय मित्र असून, ते आणि काही मित्र रात्री म्हाडा वसाहतीसमोर शेकोटी करून बसलेले होते. दरम्यान, यातील आरोपी व तक्रारदार एकमेकांच्या ओळखीचे आहेत. अक्षय कांबळे व आरोपींमध्ये जुने वाद होते. वादानंतर आरोपींच्या मनात राग होता. तक्रारदार व अक्षय शेकोटी करून तापत बसले असताना टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी कोयते व कुर्हाडीने अक्षय याच्यावर सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करत तेथे गोंधळ घालत आरोपी पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; टेम्पो अडवून 18 लाखांचा गुटखा पकडला
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.