इंदूर – जेलमधून सुटका झालेल्या एका व्यक्तीने मध्य प्रदेश सरकारकडे १० हजार ६ कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. रतलाममधील ही व्यक्ती आहे. एका खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ६६६ दिवस म्हणजे सुमारे दोन वर्ष ही व्यक्ती जेलमध्ये होती. खोट्या गुन्ह्यातून सुटका झाल्यानंतर, बाहेर आल्यावर एवढ्या मोठ्या रकमेच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यात व्यवसाय, मनस्ताप, सेक्सचा न घेता आलेला आनंद आणि खटल्याच्या खर्च याचा मोबदला मागितला आहे. इतका मोठा खर्च मागण्यामागे भगवंताने दिलेला उपहार सेक्स याचा आनंद घेता आला नाही, हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचं या व्यक्तीनं सांगितलंय.
३५ वर्षांच्या कांतीलाल भील यांनी ही १० हजार कोटींची मागणी केलीय. या खोट्या आरोपामुळे आणि जेलमध्ये गेल्यामुळं जीवनात मोठी उलथापालथ झाल्याचं त्यांनी सांगितलंय. पत्नी, दोन मुलं आणि आईला मोठ्या त्रासाला सामोरं जालं लागल्याचं त्यांनी सांगितलय. दोन वर्ष जेलमध्ये ज्या मरण यातना भोगल्य, त्या शब्दांत सांगण्यासारख्या नसल्याचं कांतीलाल म्हणतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली होती. अंतर्वस्त्र घेण्याइतपतही पैसे कुटुंबाकडे नव्हते, असंही त्यांनी सांगतिलंय. भीषण थंडी आणि उन्हाळ्यात जेलमध्ये जिवंत राहिलो असंही कांतीलाल यांनी सांगितलंय. वकिलाने पैसे न घेता खटला लढल्यामुळेच जेलमधून सुटका होऊ शकली, असंही कांतीलाल यांनी म्हटलय. आता जेलमध्ये वाया गेलेल्या पैशांचा हिशोब सरकारकडून हवा आहे, असं त्यांचं म्हणणंय. नुकसान भरपाईच्या याचिकेत कांतीलाल यांनी पोलिासंवर खोटे, मानहानीकारक जबाब दिल्याचा आरोप केलाय. या खोट्या आरोपांमुळे करियर आणि आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं त्यांचं म्हणणंय. घरात ते एकटेच कमावते होते. जेलमध्ये काही रोगही त्यांच्या पाठी लागल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलय.
तुरुंगात असताना व्यवसायात झालेलं नुकसान, शारिरिक-मानसिक कष्ट, कुटुंबाचं नुकसान यासाठी त्यांनी प्रत्येकी १ कोटींची मागणी केलीय. मात्र सेक्सचा आनंद घेऊ शकलो नाही यासाठी त्यांनी १० हजार कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. भगवंताने दिलेला हा उपहार आणि त्याचा आनंद दोन वर्ष उपभोगू शकलो नाही, असा त्यांचा दावा आहे. जेलमध्ये असताना खटल्यासाठी केलेल्या २ लाखांचा खर्चही मागण्यात आलाय.
या प्रकरणात आता १० जानेवारीला सुनावणी होणार असल्याचं कांतीलालाच्या वकिलांनी सांगतिलंय. कांतीलाल यांना गँगरेपच्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं. १८ जानेवारी २०१८ रोजी एका महिलेनं तक्रार दाखल केली होती. त्यात ती महिला भावाच्या घरी जात असताना रस्त्यात कांतीलाल यांनी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवले आणि जंगलात जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी कांतीलाल यांना अटक करुन जेलमध्ये टाकले होते.नंतर कोर्टानं त्यांची मुक्तता केलीय.