संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातील बी टी कवडे रोडवरील सराफी दुकानात घुसून तिघांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे मारून तसेच त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून सोने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली असून, चोरट्यांचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. याप्रकरणी वालचंद आचलदासजी ओसवाल (वय ७८, रा. नाना पेठ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील बोराटे वस्तीमधील अरीहंत ज्वेलर्स या दुकानात घडली. दुकानात दिवसभराचा हिशोब लिहीत असताना दुकानात शिरलेल्या दोघा चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सराफाच्या चेहर्यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्यांनी दुकानातील अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेले.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांचे अरीहंत ज्वेलर्स नावाने बी टी कवडे रोडवर सराफी दुकान आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दुकानात बसून दिवसभराचा हिशोब लिहीत होते. तेव्हा दोन चोरटे दुकानात शिरले. एकाने दुकानाचे शटर अर्धवट ओढले. तर दुसऱ्याने पिस्तुल बाहेर काढत त्यांच्यावर रोखले आणि त्यांना धाक दाखविला. तक्रारदार घाबरले. तेव्हा त्यांच्या चेहर्यावर स्प्रे मारला. डोळ्यात स्प्रे मारल्यानंतर चोरट्यांनी दागिने घेण्यास सुरूवात केली. तेव्हा अशा परिस्थितीत देखील तक्रारदारांनी त्यांना विरोध केला. त्यावर त्याने कंबरेचे लोखंडी हत्यार काढून ‘चुप बैठो’ असे म्हणत त्यांच्या डाव्या खांद्यावर मारले. ते दोघे हाताला लागतील ते दागिने घेऊन पळून गेले.
चोरट्यांनी सोन्याचे चमकी पान, सोन्याचे गलसन, सोन्याचे डोरले वाटी असा २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले. नंतर त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा परिसरात दुकान लुटल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात मोठा अपघात, महिला पोलिसाला कारने उडवले अन्…
रात्री वाहन तोडफोडीची घटना…
मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफी दुकान लुटल्याचा प्रकार घडला असताना मध्यरात्री सोसायटीत घुसलेल्या एका टोळक्याने पार्क केलेल्या तीन गाड्यांची तोडफोड केल्याची देखील घटना घडली आहे. गृरूकृपा सोसायटी ही घटना घडली असून, याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एकाच रात्रीत दोन घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे शहरातील कायदा सुव्यवस्था देखील बिघडल्याचे बोलले जाऊ लागले आहे.