संग्रहित फोटो
पाटण : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कराड-चिपळूण मार्गावर अडूळ गावच्या हद्दीतील महादेव मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.
अपघातात नारायण तुकाराम साळुंखे (येराड, ता. पाटण) युवक जागीच ठार झाला आहे. मंगळवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली आहे. नारायण साळुंखे मंगळवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास नवारस्तावरून येराडला जात असताना अडूळ गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. यात नारायण तुकाराम साळुंखे या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी मृतावस्थेतील युवक आणि त्याची दुचाकी (एमएच ५० एफ १४४९) आढळून आली. अपघाताची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एन. भुजबळ अधिक तपास करत आहेत. नारायण साळुंखे हा युवक दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता. पाटण, नवारस्ता परिसरात उत्तम मॅकेनिक म्हणून प्रसिद्ध हाेता. त्याच्या निधनाने येराड गावावर शोककळा पसरली आहे.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक
पुणे जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्रिपल सीट भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात समोरून येणाऱ्या दुचाकीवरील व्यक्तीचा नाहक बळी गेला आहे. हा अपघात १५ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता तळेगाव-चाकण रोडवर खराबवाडी येथे घडला आहे. संतोष गणपत जंबुकर (४५, नाणेकरवाडी, खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विकास मयाराम अडकमोल (२२, बिरडवडी, खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ललित विठ्ठल पाटील (२३, खराबवाडी, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.