संग्रहित फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, “पूनम” (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणीशी तक्रारदार तरुणाची इंस्टाच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोघेही दररोज सतत चॅटिंग करत होते. काही दिवसांत त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर या तरुणीने जवळीकता निर्माण करण्यास सुरूवात केली. एकेदिवशी पूनमने तरुणाला भेटण्यासाठी कात्रज परिसरात बोलावले. तक्रारदार तरुण देखील दुचाकीवर कात्रजमध्ये आला. दोघांची येथे भेट झाली. काही वेळाने पूनमने कात्रज घाटात जाण्याचा आग्रह धरला. तरुण देखील तिच्या आग्राहपोटी तिला घेऊन घाटाच्या दिशेने निघाला. मात्र, मध्येच एका ठिकाणी तरुणीने गाडी थांबवण्यास सांगितली.
गाडी थांबताच तरुणीचे दबा धरून बसलेले साथीदार आले. त्यांनी तरुणाला धमकी देत येवलेवाडीत नेले. तिथे त्याला मारहाण केली. तसेच, धमकावत पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ७० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याच्याकडे इतकी रक्कम नव्हती. आरोपींनी त्याच्याकडील १० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्याला सोडून दिले. नंतरही या टोळीने तरुणाला उर्वरित पैशांसाठी सतत फोन करून धमकावण्यास सुरुवात केली. सतत येणाऱ्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून अखेर तरुणाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी पूनम व साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या टोळीचा पोलिस शोध घेत असून, त्यांनी अशा प्रकारे अनेकांना फसविल्याचा संशय आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक थोरात करत आहेत.






