सौजन्य - सोशल मिडीया
नागपूर : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकच्या चाकात आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कपिलनगर चौकात बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेवरून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष होता. संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रक थांबवला.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या ‘या’ पक्षाचे भाजपसोबत झाले मतभेद; दौऱ्यालाही केला विरोध
माधुरी दिगांबर वनकर (वय 59, रा. बाबा दीपसिंगनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती दिगांबर वनकर (वय 63) हे सुद्धा या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास वनकर दाम्पत्य हे (एमएच 32 / एबी 3429) दुचाकी वाहनाने घरी जात होते. जरीपटका रिंगरोडवर कपिलनगर चौकात सिग्नल सुटताच ट्रक (क्र. सीजी 04 एनडब्ल्यू-7592) च्या चालकाने दिगांबर यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली.
त्यानंतर पती-पत्नी वाहनासह खाली पडले. यातून सावरण्यापूर्वीच चालकाने ट्रक माधुरीच्या अंगावरून नेला. काही अंतरापर्यंत तो त्यांना फरफटत घेऊन गेला. परिसरात एकच खळबळ उडाली. आसपासचे नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत माधुरीचा मृत्यू झाला होता. संतप्त नागरिकांनी ट्रक थांबवला.
हेदेखील वाचा : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त; यांच्या डोक्यावर… मंत्री विखेंचा ठाकरेंवर घणाघात
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांसह वाहतूक पोलिसही घटनास्थळी पोहोचले. चौकातील वाहतूक व्यवस्थेवरून नागरिकांमध्ये तीव्र रोष होता. यामुळेच हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ट्रकचालकावर आता योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.