फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कणकवली / भगवान लोके: कणकवलीतील बसस्थानकात फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा दोन एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या. दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत फातिमा रियाज धोथरे (३६, रा. उंबर्डे मेहबूबनगर) वर्षीय महिला या दोन्ही बसच्या मध्ये सापडली. ही घटना आज शुक्रवार दि. १५ नोव्हेंबरला सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर तात्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्या महिलेच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, भाजपा उपाध्यक्ष संदेश सावंत, सोनु सावंत, अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांच्यासह सर्वपक्षीयांनी ठिय्या आंदोलन छेडले, अखेर एसटीच्या अधिकाऱ्यांनी बोथरे यांच्या कुंटुबियांना ५ लाख रुपये आर्थिक मदत केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दरम्यान कणकवली बसस्थानकात पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
घटनाक्रम
कणकवली एसटी बसस्थानकात सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मृत फातिमा रियाज धोथरे (३६, रा. उंबर्डे मेहबूबनगर)या बसमध्ये चढताना दोन एसटीमध्ये धडक होऊन मध्ये अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या घटनेचे वृत्त समजताच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संदेश पारकर, अपक्ष उमेदवार नवाज खानी, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, निसार शेख, सोहन वाळके, महेश कोदे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सोनू सावंत, अण्णा कोदे, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, आशिये सरपंच महेश गुरव आदींसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत आगार व्यवस्थापक श्री. यादव यांना धारेवर धरले. जोपर्यंत विभाग नियंत्रक श्री.देशमुख येत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्धार करत बसस्थानकातच आंदोलन सुरु केले. त्यावेळी एसटी अधिकाऱ्यांना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी धारेवर धरले. तसेच यावेळी एसटी अधिकाऱ्यांना आंदोलन कर्त्यांनी विविध मुद्यांवर जाब विचारला. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी संदेश पारकर यांनी विमा मिळेल तेव्हा मिळेल आता आधी मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत करावी. जोपर्यंत रक्कम मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भुमिका घेतली. या भुमिकेला सर्वपक्षीय कार्यकर्ते व कुटुंबियांनी सहमती दर्शवत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे विभाग नियंत्रक श्री. देशमुख यांनी रोख स्वरुपात मृत महिलेच्या नातेवाईकांकडे ५ लाख रुपये सुपुर्द केले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
या अपघात प्रकरणी एसटीच्या चालक, वाहकाना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी संतप्त झालेल्या त्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी एसटीच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकरी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, कॉन्स्टेबल किरण मेथे, वाहतुक पोलीस हवालदार आर.के.पाटील, विनोद चव्हाण, मंगेश बावधाने तसेच होमगार्ड पथक तैनात करण्यात आले होते.
..त्या महिलेच्या कुंटुबियांना आंदोलन केल्याने ५ लाखाची मदत- संदेश पारकर
कणकवली बसस्थानकात एसटी प्रशासनाच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यु झाला. या प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराबद्दल आंदोलन छेडले. एसटी अधिकाऱ्यांच्या खिशातुन ५ लाखांची मदत द्यायला भाग पाडले आहे. आता या कुटुंबियांना विमा रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या अपघातात दोषी असतील त्या कर्मचारी , अधिकाऱ्यांवर निलंबनाचे आश्वासन विभाग नियंत्रक यांनी दिले आहे, अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांनी दिली आहे.
२३ तारीख नंतर त्या कुटूंबाला अपेक्षित मदत मिळेल – संदेश सावंत
बस स्थानकावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच आम्ही वाहतूक नियंत्रकांना फोन करून बोलवून घेतले. त्यावेळी बस स्थानकावरच भर उन्हात वाहतूक नियंत्रकांशी चर्चा झाली व अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार एसटी प्रशासनाकडून पाच लाखाची तातडीची मदत देण्यात आली. निवडणुकीनंतर त्या कुटुंबीयांना अपेक्षित असलेली मदत केली जाईल , अशी प्रतिक्रिया भाजपा उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी दिली.