संग्रहित फोटो
जळगाव जामोद : बुलडाण्यातील पळशी सुपो येथून शेगावकडे येणाऱ्या दुचाकीला रेती भरलेल्या टिप्परने जबर धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.9) सकाळी साडेअकराच्या सुमारास भेंडवळजवळील माऊली फाटा येथे झाला. यात दुचाकीवरील आजी-आजोबाही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
सदर अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. मृत दोन्ही बालक हे सदर दाम्पत्याचे नातवंड होते आणि उन्हाळी सुट्यांसाठी आजोबाकडे आले होते. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीने संतप्त नागरिकांना शांत करण्यात यश आले.
पार्थ चोपडे (वय 6, रा. राजापेठ अमरावती) आणि युवराज मोहन भागवत (वय 5, रा. बडनेरा, जि. अमरावती) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. ते दोघेही पळशी सुपो (ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) येथील प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर या आजी-आजोबांसह दुचाकीने शेगावकडे येत होते.
दरम्यान, पीक पाणी आणि अन्य भाकीतांसाठी प्रसिद्ध असलेल्या भेंडवळनजीकच्या माऊली फाट्याजवळ रेतीने भरलेल्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात आजी-आजोबांच्या डोळ्यादेखत घटनास्थळीच दोन्ही नातवंडाचा मृत्यू झाला तर प्रकाश आणि साधना खेडकर हे दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले.
नागरिकांसह प्रवाशांनी घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांसह प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलिसही घटनास्थळी दाखल होते. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या दाम्पत्याला रुग्णालयात हलविले तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले.
जमावाने पेटविला टिप्पर
सदर अपघाताबाबत माहिती होताच जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे ठाणेदार व पोलिस कर्मचारी माऊली फाट्यावर दाखल झाले. खामगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा हेदेखील घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत नागरिकांचा राग अनावर झाल्याने संतप्त नागरिकांनी रेतीचा ट्रक पेटवून दिला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.