भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पाकिस्तानला मनवण्यासाठी मोहसिन नकवी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना ‘रिअल हिरो’ म्हटलं आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुअर कुमार दिसानायके यांना भेटून नकवी यांनी सांगितलं की, “सर्वात अगोदर पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून तुमचं अभिनंदन. भारत – पाकिस्तान मॅचचे तुम्ही खरे हिरो आहात. कारण तुमच्यामुळेच २ अरब प्रेक्षकांचं मनोरंजन झालं आणि तुमच्यामुळेच आम्ही ही मॅच खेळलो”.
नकवी यांनी पुढे सांगितलं की, “आमच्याकडे भारताविरुद्ध न खेळण्याची बरीच कारणं होती. पण जसा तुमचा पंतप्रधानांना कॉल आला त्यानंतर त्यांनी मला फोन करुन या मॅचसाठी परवानगी दिली. या मुद्द्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे”.
श्रीलंकेचे अध्यक्ष अनुअर कुमार दिसानायके यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना कॉल केला. त्यानंतर पाकिस्तान सरकारने एका निवेदनात सांगितलं की, “श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना सध्या सुरु असलेल्या गोष्टी सोडवण्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली. त्यांनी या संभाषणादरम्यान आठवणही करुन दिली की कठीण काळात पाकिस्तान आणि श्रीलंका एकमेकांसोबत नेहमी उभे राहिले आहेत”.
भारत-पाकिस्तान मॅचवरुन झालेल्या ड्राम्यानंतरICC T-20 WORLDCUP 2026 सामन्यात भारतीय संघाने आणखी एकदा पाकिस्तानी खेळाडूंना नेस्तानाभूत केलं. भारतीय संघाने सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानंतर भारताचा सलामी फलंदाज ईशान किशनने खेळी सांभाळली. पाकिस्तान संघाने पहिल्या तीन ओव्हरमध्ये तीन विकेट गमावले. पुढे पाकिस्तानच्या संघाला खेळ सांभाळता आला नाही. भारतीय संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला.






