गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक (फोटो- istockphoto)
माळशिरस: राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. हीट अँड रन, महिलांवरील अत्याचार असतील तसेच डिजिटलयुगात सायबर क्राईम आणि ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. पोलीस प्रशासन याविरुद्ध कठोर कारवाई करताना दिसून येत आहे. मात्र काही प्रमाणात हे ऑनलाइन फ्रॉडचे गुन्हे होताना दिसून येत आहे. अकलुज येथे देखील असाच एक फसवणुकीचा गुन्हा घडला आहे. यामध्ये ११ जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास मुद्दलासह नफा देतो, अशी योजना सांगून ५ जणांनी मिळून ११ जणांकडून २० महिन्यात वेगवेगळी आमिषे दाखवत १ कोटी रूपयाची फसणूक केल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी अशोक करडुले, श्रीधर नागरगोजे, मनोज टकले, विजय जाधव व अंकुश धाकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोघांना पोलिसांनी माळशिरस येथे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अमित मोहन रणनवरे यांनी तक्रार केली. अकलूज पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कैलास करडुले (रा. खेड, पुणे), श्रीधर नाथराव नागरगोजे (रा. नागदरा, बीड), मनोज टकले (रा. केज, बीड), विजय रामचंद्र जाधव (रा. निमगाव, माळशिरस) व अंकुश धाकडे (रा. अमरावती) या पाचजणांनी त्यांच्या क्युस्ट्रा फायनान्स, क्युपे, अलायंन्स सोलुशन या कंपनीत गुंतवणूक करुन मुद्दल व नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १२ डिसेंबर २०२२ ते ११ ऑगस्ट २०२४ या २० महिन्यात अमित रणनवरे (रा. मांडकी, ता. माळशिरस यांच्यकडून २७ लाख ४८ हजार, नागन्नाथ पांडुरंग जानकर याच्याकडून १० लाख रुपये, शिवाजी ठवरे यांच्याकडून २ लाख रुपये, अजित कदम यांच्याकडून ४ लाख रुपये, ज्योतीराम नलवडे यांच्याकडून ४ लाख रुपये, एन. डी. खरात यांच्याकडून १ लाख रुपये, रोहित भुजबळ यांच्याकडून ४ लाख रुपये, चैतन्यकुमार देवकाते यांच्याकडून १५ लाख २० हजार रुपये, अनिस मुलाणी यांच्याकहून ३ लाख रुपये, राहुल देशमुख यांच्याकडून ४ लाख रुपये, शशिकांत रणनवरे यांच्याकडून ४ लाख रुपये, दादा जानकर यांच्याकडून ३ लाख रुपये अशी एकुण१ कोटी १३ लाख ३३ हजार रुपये रक्कम घेतली.
पोलीसांनी पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. त्यातील श्रीधर नागरगोजे, विजय जाधव यांना अटक करुन माळशिरस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हेड कॉन्सटेबल अमोल बकाल, विकी घाडगे, समीर पठाण तपास करीत आहेत.
हेही वाचा: Pune Crime : बांधकाम व्यावसायात गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक, तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
गुंतवणूकदारांना जिवे मारण्याची धमकी
घेतलेल्या रकमेतील नागनाथ जानकर व त्यांच्यामार्फतच्या लोकांना ७ लाख रुपये मुद्दल व ७ लाख रुपये नफा असे एकुण १४ लाख रुपये कंपनीने त्यांच्या खात्यावर परत जमा केले. त्यानंतर कोणालाही मुद्दल व त्याचा नफा दिला नाही. गुंतवलेल्या रक्कमा व त्याचा नफा मागितला असता गुंतवणूकदारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली . दरम्यान आम्ही व्यवसायातील अयुष्यभराची कमाई उसनवार व कर्जे काढून रक्कम गुंतवलली आहे. वेगवेगळी आमिषे दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडले आहे. कंपनी बंद करुन फसवणूक करणारे निघून गेल्याचे अमित रणनवरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.