सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : लष्कर परिसरातील दोन महिलांनी सहा जणांना बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविल्यास तयार होणार्या इमारतीत व्यावसायिक गाळे किंवा निवासी गाळे देण्याचे आमिष दाखवून ६५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मेहबुब अब्दुलगनी शेख (वय ६८, रा. कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फरहानाझ सादीक कुरेशी आणि हिना सादीक कुरेशी (दोघी रा. भिमपुरा, कॅम्प) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचे इतर ५ नातलग यांना आरोपी यांनी संगनमत करुन आरोपीचे बांधकाम व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यातून येणार्या उत्पन्नातून बांधकाम व्यवसायात तयार होणार्या इमारतीतील व्यावसायिक गाळे किंवा निवासी गाळे कायम स्वरुपी खरेदीने देण्याचे ठरले होते. तक्रारदार व त्यांच्या ५ नातलगांनी एकूण ६५ लाख ५० हजार रुपये गुंतविले होते. नंतर त्यांना व्यवसायिक गाळे किंवा निवासी गाळे न देता, त्यांची फसवणूक केली. त्यांनी पैसे परत मागितल्यावर आरोपींनी वेगवेगळ्या बँकेचे धनादेश दिले. मात्र, खात्यात पैसे नसल्याने ते धनादेश परत आले. तक्रारदार हे पैसे मागण्यास गेले असता फरहाना कुरेशी या दुसरीकडे राहण्यास गेले असून त्यांनी विश्वासघात करुन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक गुजर तपास करीत आहेत.