सोशल मीडियावरील ओळख अन् अल्पवयीन युवती निघाली रायबरेलीला; हातकणंगले पोलिसांची तत्परता आली कामी...
हातकणंगले : सोशल मीडियावरील मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि हातकणंगले शहरातील 14 वर्षीय अल्पवयीन युवती थेट आपल्या रायबरेली उत्तर प्रदेश येथील मित्राकडे जायाला निघाली. या घटनेने हातकणंगले शहरात सोमवारी सकाळी चांगलीच खळबळ उडाली. हातकणंगले येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन युवती शहरातीलच एका शाळेमध्ये शिक्षण घेते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून रायबरेली उत्तर प्रदेश येथील एका युवकाशी त्याची मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. याच घटनेतून सोमवारी पहाटे संबंधित अल्पवयीन युवती घरच्यांना कोणतीही कल्पना न देता उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे जाण्यासाठी निघाली होती. याची कल्पना तिच्या पालकांना येताच त्यांनी हातकणंगले पोलीस स्टेशन गाठले. याबाबत पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हातकणंगले शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन युवती रायबलेली जाण्यासाठी निघाली.
हेदेखील वाचा : Beed Crime: बीडच्या आष्टीत मध्यरात्री दरोडा! घराचे दरवाजे लाथाडून महिलांना पायाखाली तुडवले आणि…
संबंधित मुलगी आणि रायबरेलीतील मुलगा यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यातूनच संबंधित अल्पवयीन मुलगी सोमवारी पहाटे घरी कोणालाही कल्पना न देता सोशल मीडियावरून ओळख झालेल्या आपल्या मित्राकडे जात असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. तात्काळ त्यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याची संपर्क साधत घटनेची माहिती दिली. याप्रकरणाची गांभीर्य ओळखून हातकणंगले पोलिसांनी तात्काळ एक पथक तिच्या मागावर पाठवले.
संबंधित युवती पटणा बिहार याठिकाणी जाण्यासाठी निघाल्या. हातकणंगले येथून पटणा येथे जाण्यासाठी कोणतीच गाडी नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र, संबंधित युवती कोयना एक्सप्रेसने मुंबई येथे जात असल्याची माहिती मिळाली. हातकणंगले पोलिसांनी लगेचच सातारा रेल्वे पोलीस व सातारा पोलीस यांना तात्काळ संबंधित युवतीचे फोटो व तिच्याकडे कोणती बॅग आहे, याची माहिती पाठवली
पोलिसांकडून शोधमोहीम
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ सातारा पोलीस व रेल्वे पोलीस यांनी कोयना एक्सप्रेसमधील प्रत्येक डब्यात शोधमोहीम राबवण्यास सुरूवात केली. अखेर रेल्वे लोणंद रेल्वे स्थानकावर पोहचली असता संबंधित युवती मिळून आली. पोलिसांनी तिला सुखरूप ताब्यात घेतल्याचे हातकणंगले पोलीसांना कळवले. या युवतीला ताब्यात घेण्यासाठी हातकणंगले पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ लोणंद येथे रवाना करण्यात आल्याची माहिती हातकणंगले पोलिसांकडून देण्यात आली.
सोशल मीडिया वापरण्याचे वाढले प्रमाण
शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडिया वापराचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याच्या गंभीर परिणामांबद्दल कुठलीच गांभीर्यता पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाही. त्यामुळेच असे धाडसी कृत्य करायला ते मागे पुढे पाहत देखील नाहीत. त्यामुळे पालकांनी देखील सोशल मीडिया व मोबाईल विद्यार्थ्यांना वापरण्यास देण्याबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहेच. मात्र, शाळा स्तरावर समुपदेशन देखील गरजेचे आहे.






