संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करुन लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. शेअर मार्केट तसेच आयपीओबाबत व्हॉट्सअप पीडीएफद्वारे माहिती देऊन तसेच जास्त परतावा देण्याच्या आमिषाने दोघांना तब्बल ९० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर व नांदेडसिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे शहरात सातत्याने सायबर फसवणूकीचे प्रकार घडत आहेत. वारंवार पोलिस तसेच प्रशासनाकडून जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये, यासाठी प्रभोदन केले जात असताना फसवणूकीचे सत्र कायम आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ८१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, सायबर चोरटे, बँक खातेधारक, मेल आयडीचे वापर करते अशांवर आयटी अॅक्ट व फसवणूकप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा परिसरात राहण्यास आहेत. त्यांना २१ एप्रिल रोजी एका व्हॉट्सअप पाहत असताना त्यांना एका ग्रुपवर सहभागी करण्यात आले. त्यात शेअर मार्केट, आयपीओबाबत माहिती देणारी पीडीएफ टाकली. नंतर त्यांना लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. याठिकाणी खाते उघडल्यानंतर स्टॉकवरती ट्रेडिंग केले तर जास्त परतावा मिळेल अशी बतावणी केली. नंतर त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यांनी ४ एप्रिल ते १२ जून या कालावधीत त्यांनी एकूण ५७ लाख रुपये भरले. पण, त्यांना कसलाच परतावा दिला नाही किंवा त्यांनी भरलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक संगिता देवकाते हे करत आहेत.
दुसऱ्या प्रकारात ४० वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटच्या ट्रेडींगवर मोठा परतावा देण्याच्या आमिषाने ३३ लाख ४६ हजार ७७७ रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ४ जून ते २२ जून या कालावधी ही फसवणूक केली आहे.
फॉरेक्स ट्रेडिंगमधील गुंतवणूकीच्या आमिषाने ३५ लाखांना गंडा
फॉरेक्स ट्रेडींगची माहिती व्हॉट्सअप तसेच मेलद्वारे देऊन त्यातील गुंतवणूकीवर जास्त फायदा होईल या आमिषाने ३५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत नांदेडसिटी पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. याबाबत ६६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यांना कोणते शेअर खरेदी व विक्री केले. त्याचा नफा याची माहिती गुगलवरील ट्रेडगिरी या अॅपवरून माहिती मिळेल असे सांगितले होते. त्यांना चांगला परता देऊ असा विश्वास संपादन केला होता. त्यानूसार त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली.