संग्रहित फोटो
आळेफाटा : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपळवंडी येथील लेंडे बामणे मळा परिसरात शेताच्या बांधाच्या किरकोळ वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी काठी व दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सिताराम शिंदे हे त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना शेजारील नवनाथ जगन्नाथ शेळके व संजय जगन्नाथ शेळके यांनी शेताचा बांध नांगरल्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. हा वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला.
फिर्यादीनुसार, नवनाथ शेळके यांनी लाकडी काठीने रमेश शिंदे यांना पायावर व पाठीवर मारहाण केली. ते खाली पडल्यानंतर त्यांच्यावर दगडाने डोक्यात वार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जखमी रमेश शिंदे यांना प्रथम घरी आणण्यात आले. मात्र रात्री त्यांना चक्कर येणे, उलट्या होणे आणि प्रकृती बिघडल्याने आळेफाटा येथील युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…
तपासणीदरम्यान त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी रमेश शिंदे यांच्या पत्नी लता रमेश शिंदे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, नवनाथ जगन्नाथ शेळके आणि संजय जगन्नाथ शेळके या दोघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.






