संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. चोरटे रस्त्यात नागरिकांना टार्गेट करत चोऱ्या करत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी एका दाम्पत्याला अडवून त्यांना पुढे चेकींग सुरू असल्याची बतावणी करून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगत ते हातचालाखीने चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
वारजे माळवाडी येथील हरीभाऊ पाटलू चौधरी चौकात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ५८ वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटे रस्त्यावर चोऱ्या करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार या कोथरूड डेपो परिसरात राहण्यास आहेत. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्या व त्यांचे पती दुचाकीवरून वारजे चौकाकडून सर्व्हिस रोडने घराकडे निघाल्या होत्या. दरम्यान, पाठिमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना हरीभाऊ पाटलू चौधरी चौकात अडविले. तसेच, पुढे चेकींग सुरू आहे. तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा अशी बतावणी केली. यावेळी महिला भयभित झाली व त्यांनी पुढचा धोका टाळण्यासाठी अंगावर असलेले १ लाख ४० हजारांचे दागिने पिशवीत ठेवण्यास सुरू केले. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिने घेऊन ते पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून हातचालाखीने दागिने घेऊन पोबारा केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट
गेल्या काही दिवसाखाली बावधन परिसरातील एक ज्येष्ठ महिलेने पीएमटी तसेच रिक्षा प्रवास सुरू केल्यानंतर या प्रवासात त्यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने तब्बल ११ लाखांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुपारी साडे बारा ते अडीच या कालावधीत त्या प्रवासात होत्या. याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली आहे.
पॅन्टच्या खिशातून ६ हजारांची रोकड चोरली
पुणे शहरात सोनसाखळी, घरफोडी, वाहन चोरीसोबतच भुरट्या चोरट्यांनीही धुमाकूळ घातला असून, पुणे रेल्वे स्थानक परिसरात गर्दीतून एका व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशातून ६ हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार मिराभाईंदर येथून पुण्यात काही कामानिमित्त मंगळवारी सायंकाळी आले होते. तेव्हा ही घटना घडली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.