संग्रहित फोटो
इचलकरंजी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईप एकाच्या डोक्यात मारला आहे.
पाईप डोक्यात मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. निखिल नितीन घाडगे (वय 25 रा. साईनाथनगर भोनेमाळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आशादुल्ला हारुण जमादार (वय 27 रा. अशोक सायझिंगमागे) याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात वावरत होता. ही घटना विसर्जन मिरवणूकीदरम्यान रात्री 9 वाजता घडली आहे.
आशादुल्ला जमादार हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार नोव्हेंबर 2024 मध्ये एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करत जमादार हा शनिवारी इचलकरंजीत वावरत होता. कामगार चाळ परिसरात त्याने निखिल घाडगे याच्याकडे गाडीची मागणी केली असता त्याने नकार दिला. त्यामुळे संतापाच्या भरात जमादार याने शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी पाईपने घाडगे याच्या डोक्यात पाठीमागून जोरात मारले. त्यामध्ये घाडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
टोळक्याकडून तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार
गेल्या काही दिवसाखाली पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश उणेचा, चैतन्य, तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात राहुल बंडू पवार (वय ३१, सध्या रा. काळेपडळ. मूळ रा. रांजणी, ता. गेवराई, जि. बीड ), गौरव नितीन साठे, राजा मुन्ना पंडीत जखमी झाले आहेत. पवार यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.