संग्रहित फोटो
पिंपरी : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांर्तगत (मोक्का) कारागृहात असलेल्या काळेवाडीतील डी गँगच्या सराईत गुंडाला सोडविण्यासाठी त्याच्या टोळीतील साथीदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकार्याकडे दोन लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, खंडणी न दिल्याने टोळीने त्याच्या भावावर प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना काळेवाडी येथे घडली आहे.
सचिन बाबाजी काळे (रा. आदर्शनगर, काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल खेडकर, गणेश बोरुडे, शुभम खेडेकर याना अटक केली आहे. तर, आदित्य चोथे, बंड्या सगर, संतोष चव्हाण व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील अमोल खेडेकर, आदित्य चोथे व बंड्या सगर हे सराईत गुन्हेगार आहेत. काळेवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी याबाबत माहिती दिली. सराईत गुन्हेगार प्रशांत दिघे याच्यावर तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. डी भाई अशी त्याची ओळख आहे. त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, सध्या तो कारागृहात आहे.
फिर्यादी सचिन काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत. त्यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. आरोपी अमोल याने २० दिवसांपूर्वी डी भाई उर्फ प्रशांत दिघे याला सोडविण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली होती. मात्र, पैसे न दिल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी गुरुवारी फिर्यादी यांच्या कार्यालयात शिरले. फिर्यादी यांचे भाऊ राहुल काळे याना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात अमल खेडकर याने बाटली फेकून मारली. त्यानंतर फिर्यादी हे तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपींनी त्याठिकाणी आरडाओरडा व शिवीगाळ करीत परिसरात दहशत निर्माण करीत फिर्यादी याना अडविले.
बंड्या सगर हा हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करीत होता. आरोपींनी फिर्यादीसह त्यांचे भाऊ राहुल, शुभम काळे, निहाल नदाफ व उमेश जोगदंड याना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. बंड्या सगर याने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडे खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली. सहायक पोलिस निरीक्षक गुरव तपास करीत आहेत.
खासदाराला डी भाईचा आला होता पुळका….
डिसेंबर २०२४ मध्ये घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यात गुंड प्रशांत दिघे याचे नाव आलेले असताना त्याचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी एका खासदाराने पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी मोठी धावाधाव केली. याची शहरभर चर्चा झाली. मात्र, पोलिसांनी दबाव झुगारून दिघे याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकाराने दुखावल्याने त्यांनी पोलीसांवर हप्तेवसुलीचा आरोप केला होता. आता याच प्रशांत दिघेला कारागृहातून सोडविण्यासाठी डी गँगच्या टोळीतील गुंडांकडून खंडणी मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.