लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : एका प्रतिष्ठित महाविद्यालयात इंग्रजी विभागाचा प्राध्यापक असलेल्या पित्याचा निर्घृण खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी अल्पवयीन मुलाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. या खुनाच्या घटनेत, गुन्ह्याच्या क्रूरतेमुळे आणि पूर्वनियोजित कटामुळे अल्पवयीन असलेल्या मुलाला प्रौढ समजण्यात येऊन न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
११ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राध्यापकाच्या राहत्या घरी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या डोक्यावर डंबेलने वार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या पोटावर बसून त्यांचा गळा आणि हाताच्या नसा कापण्यात आल्या होत्या. निर्दयीपणे केलेल्या या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घरातीलच कोणीतरी खून केला असावा असा पोलिसांना संशय होता. त्यानुसार, पोलिसांनी तपास करत घटनेच्या तब्बल सात दिवसांनंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते.
हेदेखील वाचा : Gujrat Crime: प्रेयसीवरून वाद आणि मित्रानेच केले मित्राच्या शरीराचे तुकडे; डोके, हात, पाय वेगळे केले आणि…
प्राध्यापक वडील सतत अपमान करतात, म्हणून मुलाच्या मनात पित्याविरोधात प्रचंड राग होता. १० ऑक्टोबर रोजी वाद झाल्यानंतर वडील आपल्या घरात हॉलमध्येच झोपी गेले होते. ही संधी साधून संबंधित मुलाने त्यांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार, त्याने पहाटे तीनच्या सुमारास गाढ झोपलेल्या पित्याच्या डोक्यात डंबेलने घाव घातला. हा वार इतका भयंकर होता, की ते कसला आवाज न करता जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. पण ते जीवंत असावेत, असं मुलाला वाटलं. त्यामुळे त्याने किचनमधील चाकूने पित्याच्या हाताच्या नसा कापल्या तसेच गळाही चिरला.
खूनाचा पूर्वनियोजित कट
पोलिसांच्या तपासात अल्पवयीन मुलाने खुनाची पूर्वतयारी केल्याचे उघड झाले होते. मुलाने गुन्हा करण्यापूर्वी ओटीटीवर मर्डर मिस्ट्री, व्हायलेट आणि मर्डर रिलेटेड क्राईम चित्रपट आणि वेबसिरीज पाहिल्या होत्या. त्याने वेगवेगळ्या ब्राउझरद्वारे खून कसा करायचा आणि पुरावे कसे नष्ट करायचे याबद्दल सर्च केले होते. विशेष म्हणजे, सर्च केलेली ही माहिती पोलिसांना मिळू नये म्हणून त्याने डार्क वेब वापरल्याचे तपासात स्पष्ट झाले.
विहिरीतून हत्यार, स्कूटरमधून जप्त केले कपडे
अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली अतिशय जवळच्या नातेवाइकांसमोर रडून मिठी मारत दिली होती, हा कबुलीजबाब पोलिसांनी इन कॅमेरा नोंदवला होता. गुंतागुंतीच्या या प्रकरणात तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे, गिता बागवडे, सहायक निरीक्षक इंगळे आदींनी सखोल तपास करत ठोस पुरावे मिळवले होते. विहिरीत फेकून दिलेले गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यार शोधून काढणे, तसेच बंद पडलेल्या स्कूटरमधून खून करतेवेळी परिधान केलेले कपडे देखील पोलिसांनी हस्तगत केले होते.






