मुंबई : केवळ पाच सेकंदात एटीएम हॅक (ATM Hack) करून बँकांची फसवणूक (Bank Fraud) करण्याचा प्रकार भांडुपमध्ये (Bhandup Police) उघड झाला आहे. भांडुप पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
आरिफ खान आणि तारीख खान असे अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोन्ही हरियाणाचे (Haryana) रहिवासी आहेत. या दोघांना एटीएम मशीनमधून पैसे काढताना ट्रान्जेक्शन झाल्यावर पाच सेकंदात ती मशीन हॅक कशी करायची याची माहिती मिळाली. त्यानुसार ते एनआरसी कंपनीचे (NRC Company) एटीएम असलेल्या बँकांमध्ये जाऊन पिन टाकल्यानंतर ट्रेमध्ये पैसे येताक्षणी ते एटीएम हॅक करायचे. ज्यामुळे बँकांच्या अकाउंटमध्ये या व्यवहाराची इंट्रीच व्हायची नाही आणि मात्र आरोपींना रोख रक्कम मिळत होती.
आतापर्यंत या दोघांनी विविध एटीएममधून दोन लाख ५५ हजाराची रोख रक्कम हॅक करून काढली आहे. भांडुपमधील अभुदय बँकेच्या एटीएममध्ये एक जण संशयास्पदरित्या वारंवार ट्रांजेक्शन करत असल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यांनी त्याची चौकशी करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी यानंतर त्याची उलट तपासणी करून आणखी एका साथीदाराला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले.
एटीएम सुविधा पुरविणाऱ्या एनआरसी कंपनीला या संदर्भात बँक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीने आपले एटीएम ही बंद केले आहेत. या दोघांनी नेमका आतापर्यंत बँकांना कितीचा गंडा घातला, याचा अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.