सत्र बारामती न्यायालयाने दौंड विनोद नरवाल यांच्या हत्येच्या प्रकरणी निकाल दिला आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
बारामती : बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बारामती न्यायालय स्थापन झाल्यापासूनचा ऐतिहासिक निकाल दिला आहे. 12 आरोपींना दौंड येथील विनोद नरवाल यांच्या हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा, तसेच इतर विविध कलमांखाली सक्त मजूरी व दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये चार सख्ख्या भावांसह तीन महिलांचा समावेश आहे.
संजीत जयप्रकाश टाक, सुजित जयप्रकाश टाक, रवि जयप्रकाश टाक, रणजित जयप्रकाश टाक,आकाश उर्फ छोटू दिपक बेहोत, नरेश प्रकाश वाल्मिकी, बबलू हिरालाल सरवान, सुरेश हिरालाल सरवान, मयुरी संजीत टाक, माधुरी सुजित टाक, शोभा किशोर वाल्मिकी, विकी नरेश वाल्मिकी अशी याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे मीना विनोद नरवाल (रा. दौंड )यांनी त्यांचे पती विनोद नरवाल( रा. दौंड) यांच्या हत्या प्रकरणी वरील १२ व इतर आरोपींच्या विरोधात तक्रार दिली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सदरची घटना दि. ३ मे २०१८ रोजी दौंड येथे घडली होती. फिर्यादी मीना नरवाल व त्यांचे पती विनोद नरवाल चधुर्ती असल्याने रात्री १० वा. दरम्यान त्यांच्या दूचाकी स्कुटी वरुन गणपतीचे दर्शन घेऊन येत होते. यावेळी सर्व आरोपींनी दौड कोर्टाचे जवळ, पासलकर वस्ती येथे आडवले व यातील वरील १२ व इतर अनोळखी लोकांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठया, फरशीचे तुकडे, दगडांनी नरवाल यांना बेदम मारहाण केली. यावेळी फिर्यादी मीना नरवाल यांनी त्यांचे पती विनोद यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. आरडा ओरडा ऐकून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपा वडमारे या मध्ये आल्या असता, त्यांना मारहाण करण्यात आली. विनोद नरवाल यांना उपचारा साठी प्रथम दौंड व नंतर पुणे येथे नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
त्या अनुषंगाने विनोद नरवाल यांची पत्नी मिना नरवाल यांनी दौंड पो.स्टे. मध्ये भा.द.वि. कलम ३०२,३४१,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६ व शस्त्र अधिनियम ४, २५ व २७ प्रमाणे दौंड पोलीस स्टेशन येथे सर्व आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी करून सर्व आरोपी विरुध्द बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटला बारामती येथील अति. व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती. एस. आर. पाटील यांचे समोर चालला. सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहीले. त्यांनी सर्व आरोपीं विरुध्द दोषसिध्दीसाठी ८ साक्षीदार तपासले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यात आलेला फिर्यादी यांचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा व न्याय वैदयकीय पुरावा व सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन १२ आरोपींना भा.द.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व २५ हजार रुपये दंड प्रत्येकी व दंड न भरल्यास ३ महिने कैद, तसेच भा.द.वि. कलम ३४१ प्रमाणे पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद, तसेच भा.द.वि. कलम ५०६ प्रमाणे ३ वर्षे सक्त मजूरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद, तसेच भा.द.वि. कलम १४३ प्रमाणे पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद, तसेच भा.द.वि. कलम १४८ प्रमाणे १ वर्षे सक्त मजूरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधी कैद, तसेच सर्व आरोपींनी दंडाची एकूण रक्कम रुपये ५ लाख ४ हजार न्यायालयात जमा केल्यास सदरची रक्कम मूळ फिर्यादी मिना नरवाल यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना सहायक सरकारी वकील डी. एस. शिंगाडे, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. मंगेश देशमुख तसेच कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव आत्माराम नलवडे व जी. के. कस्पटे व पोलीस हवालदार मनिषा अहिवळे यांचे सहकार्य लाभले.






