बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचाराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलीला ५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. बोपदेव घाट सामुहिक अत्याचारप्रकरणातील पिडीत तरुणीला ‘मनोर्धेय’ योजनेंतर्गत ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. भरपाई मिळण्याच्या अर्जास त्वरित मंजूर देत विधी सेवा प्राधिकरणाने तरुणीला दिलासा दिला आहे. अर्ज केल्यानंतर तो केवळ नऊ दिवसांत मंजूर करण्यात आला.
कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात असलेल्या टेबल पॉइंट येथे १५ दिवसांपूर्वी (दि. ३) मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीला गाठत त्यांना लुटण्यात आले. नंतर मित्राला ठार मारण्याची धमकी देत कोयता दाखवून सामूहिक अत्याचार केला होता. या गुन्ह्यात आत्तापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून तरुणीने प्राधिकरणात अर्ज केला होता. प्राधिकरणाने या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित अर्जाची पडताळणी केली. तसेच, जलदगतीने नुकसान भरपार्इ मंजूर केली आहे. आता यातील २५ टक्के रक्कम तरुणीला रोख स्वरूपात दिली जाणार आहे. तर ७५ टक्के रक्कम १० वर्षांसाठी तिच्या नावे बॅंकेत मुदतठेव म्हणून ठेवली जाणार आहे. त्यातून येणाऱ्या व्याजातून तिला पुढील उपचार घेता येऊ शकतात. तर दैनंदिन खर्च भागविण्यासाठी तिला यातून मदत होणार आहे.
काय आहे ‘मनोधैर्य’ योजना?
अत्याचार झालेले बालक किंवा महिलेचे पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरू केली आहे. प्राधिकरणात या योजनेची अंमलबजावणी होते. या योजनेंतर्गत अत्याचारातील पिडीतेला कमीत कमी ३० हजार रुपयापासून ते १० लाख रुपयापर्यंत भरपार्इ दिली जाते. अत्याचार झालेली मुलगी किंवा महिलेला पुन्हा त्याच प्रकारच्या शोषणाला बळी पडावे लागू नये यासाठी तातडीने आधार व धैर्य देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
हेही वाचा: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीवर आधीही दाखल आहे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुलीला लवकरात लवकर नुकसान भरपार्इ देण्याचे प्राधान्य होते. त्यामुळे कोणताही विलंब न करता प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार त्वरित अर्ज निकाली काढला. तरुणीने ११ ऑक्टोबर अर्ज केला होता, तो १९ ऑक्टोबरला निकाली काढण्यात आला. मनोर्धेयचे अर्ज तत्परतेने निकाली काढत झिरो पेंडन्सी तत्त्वावर प्राधिकरण कार्य करत आहे.
– सोनल पाटील, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण