पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास(संग्रहित फोटो)
आळेफाटा : घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना भटकळवाडी, पिंपळवंडी येथे घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दीपज्योती विशाल सैद (वय ४०, रा. भटकळवाडी, पिंपळवंडी) या कुकडी व्हॅली शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी त्या घराबाहेर असताना शेजाऱ्यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा दिसत असल्याचे सांगितले. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घरी धाव घेतली. घराजवळ पोहोचल्यावर दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच अन्य साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरट्यांनी सोन्याची कर्णफुले, बांगड्या, लक्ष्मी हार, अंगठी, मंगळसूत्र, चांदीच्या पैंजणांच्या तीन जोड्या, चार हातातील कड्या, चांदीचा छल्ला, कंबरपट्टा/साखळी, दोन चांदीची नाणी तसेच डीव्हीआर उपकरण असा एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ऋषिकेश टिटमे पुढील तपास करत आहेत.
महिला खेळाडूविरोधात गुन्हा दाखल
दुसऱ्या एका घटनेत, जम्मू काश्मीरची महिला क्रिकेटर फरखंदा खान (वय 30), तिचा भाऊ बाजिल खान (वय 27) आणि साथीदार उद्दीन इम्तियाज वानी (वय 22) यांच्याविरोधात सेक्सटॉर्शन आणि कोलाबातील एका व्यापाराकडून 23.61 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, 1500 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तीन्ही आरोपींनी व्यापाराचे प्रायव्हेट चॅट्स पब्लिक करण्याचे आणि त्याच्या कुटुंबाला इजा पोहोचवण्याची धमकी दिली होती.






