विनापरवानगी कार्यक्रमाचे केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान सर्वत्र प्रचार सभा जोरात सुरू आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. महत्वाच्या नेत्यांच्या बॅग्सची तपासणी केली जात आहे. त्यावरून देखील राजकारण तापले आहे. प्रचाराच्या तोफा शांत होण्यासाठी अगदीच काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान पुण्यातील खडकवासला मतदारसंघात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी कार्यक्रमाचे केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भरारी पथकातील समन्वय अधिकारी राहुल साळुंखे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, रोहन ज्ञानोबा धावडे, संजय उर्फ बाबू दोडके, अजय पोळ (तिघे रा. वारजे माळवाडी) यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धावडे, दोडके, पोळ यांनी चांदणी लॉन येथे रविवारी (१० नोव्हेंबर) सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी विनापरवानगी सभा, तसेच स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले.
नागरिकांना समाज माध्यमातून संदेश पाठविले. ‘वारजेकरांचा निर्धार, सचिनभाऊ दोडकेच आमदार’, असे फलक कार्यक्रमस्थळी लावले. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी तपास करत आहेत. खडकवासला मतदारसंघात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी यापूर्वी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा आचरसंहिता भंग झाली आहे.
काही दिवसांपूर्वी धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल
सब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटण्याचे किट घेऊन जाणारा टेम्पो निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडला. नंतर याची निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर तसेच त्यांच्या हिंदमाता प्रतिष्ठान विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निवडणूक आयोगातील अधिकारी स्वामीनंद पोतदार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार, टेम्पो चालक तुषार अशोक अंदे तसेच आमदार रविंद्र धंगेकर गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय ?
विधानसभा निवडणूकाची आचारसंहिता गेल्याच आठवड्यात लागू झाली आहे. विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. याकाळात मतदारांना आमिष दाखवल्यानंतर गुन्हा नोंदवला जातो. दरम्यान, कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांचे हिंदमाता प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांना दिवाळीनिमित्त सुगंधी, उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप होत होते. या पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच एका स्थानिक कार्यकर्त्याचा फोटो छापलेला होता.