(फोटो-istockphoto )
पुणे: पुणे शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. चोरीमारी, हत्या, टोळी युद्ध, हीट अँड रन असे अनेक प्रकारचे गुन्हे शहरात घडत आहेत. पुण्यात विद्यार्थिनी देखील सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पुण्याच्या मध्यभागात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तसेच परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचे चोरुन फोटो काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अजित अरुण शिंगोटे (वय ३१, रा. ओैंदुबर सहवास सोसायटी, शनिवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत २४ वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. शनिवार पेठेतील एका सोसायटीत तरुणीने मैत्रिणींसोबत फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला आहे. या परिसरातील एका इमारतीत राहायला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंगोटे खिडकीत थांबून तरुणी आणि मैत्रिणींकडे पाहत होता. खिडकीत थांबून तो मोबाइलवर चित्रीकरण करत होता. ही बाब तरुणी आणि तिच्या मैत्रिणीस समजली. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करत आहेत. मोबाइलवर तरुणींची छायाचित्रे, तसेच चित्रीकरण करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. नकळत मोबाइलवर चित्रीकरण करून चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याच्या घटना घडल्या आहेत. असे प्रकार करणाऱ्यांची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मोबाइलवर संपर्क साधून महिलेला त्रास
महिलेस सतत कॉल करून मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तिला त्रास देणाऱ्या साताऱ्यातील एकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. जहाँगीर नदाफ (वय ४०, रा. उंब्रज, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. नदाफ महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधून तिला त्रास देत होता. महिलेशी अश्लील भाषेत संवाद साधत होता. नदाफच्या त्रासामुळे अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मालुसरे तपास करत आहेत.
पुणे शहरात आता सायबर गुन्हेगारी देखील वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज शहरात सायबर क्राईमची घटना घडली आहे. तुमच्या नावाने मुंबई ते शांघाई पार्सल पाठविलेले आहे. त्यात एटीएम कार्ड, ड्रग्स आढळले असून, तुमचे पैसे सरकारच्या सुरक्षा खात्यात पाठवून तपासायचे आहेत, अशी बतावणी करून सायबर चोरट्यांनी आयटी इंजिनिअर महिलेची तब्बल ३ कोटी ५६ लाख ७५ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे.