भिगवणमध्ये पोलीस स्टेशनसमोर सिनेस्टाईल राडा, १४ जणांवर गुन्हा दाखल
भिगवण (ता. इंदापूर): भिगवण शहरात गुरुवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या समोरच दोन गटांत झालेल्या सिनेस्टाईल हाणामारीने एकच खळबळ उडाली. हॉटेलमधील पैशाच्या व्यवहारातून पेटलेला वाद थेट शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाणीपर्यंत पोहोचला.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या प्रकरणी पोलीस हवालदार अन्सार शेख यांच्या फिर्यादीवरून १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी बीएनएस कलम १९४(२) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०, ११२, ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित
या हाणामारीत सहभागी: महेंद्र नानासो जगताप (३८, डाळज नं. ३), निलकंठ नरहरी वाकळे (४६, डाळज नं. ३), भरत संतोष भोसले (२६, डाळज नं. १), केतन नाथासो कुताळ (३३, भादलवाडी), देविदास बाळासो खारतोडे, योगेश तात्याराम खारतोडे (३४, विठ्ठलवाडी कळस), निलेश मनोहर हगारे (३४, डाळज नं. २), अमर सुरेश जगताप (३४, डाळज नं. २), तन्मय विलास नाळे (१९, पोंधवडी), विशाल मारूती गाडेकर (२४, पोंधवडी), महेश लक्ष्मण खारतोडे (४०), संपत ज्ञानदेव खारतोडे (२२), नितीन जगन्नाथ खारतोडे (२२), सचिन जगन्नाथ खारतोडे (३०, सर्व रा. पोंधवडी, ता. इंदापूर)याशिवाय इतर ७ ते ८ अज्ञात व्यक्तींचा देखील या गोंधळात सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; मंडळांच्या अध्यक्षांसह मालकांवर पोलिसांची मोठी कारवाई
पोलिस तपास आणि नागरिकांचा प्रश्न
सध्या पोलीस हवालदार लोडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मात्र, या गोंधळाच्या वेळी पोलीस ठाण्याच्या समोरच अशी उघडपणे हाणामारी घडली असताना पोलिसांची उपस्थिती का नव्हती? हा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. यामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर, बंदोबस्ताच्या नियोजनावर आणि संकटकाळी कायद्याच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, मागील वर्षीही गणपती विसर्जनाच्या काळात भिगवणमध्ये दोन गटांत वाद झाला होता. त्यामुळे यंदा अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीदेखील यंदा भांडण थेट पोलिस ठाण्याच्या गेटसमोरच झाल्याने पोलिस यंत्रणेच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.