संग्रहित फोटो
पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेवर कर्णकर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. दत्तवाडी आकुर्डी येथे शिवाजी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत लेजर बीम आणि डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याने मंडळाचा अध्यक्ष सुरज मारुती पिंजण (दत्तवाडी, आकुर्डी), डीजे चालक मालक आणि ट्रॅक्टर मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गरदरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लेजर बीम आणि डीजे प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गरदरे यांच्या फिर्यादीवरून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुदर्शन मित्र मंडळ, सुदर्शननगर आकुर्डी या मंडळाचा अध्यक्ष आदित्य सुनील शिंदे, डीजे मालक क्षितिज शहा (श्रीरामपूर, अहिल्यानगर) आणि बीम लाईट मालक सिद्धांत गणेश यादव (कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळाच्या मिरवणुकीत बंटी गृपजवळ आवाजाची पातळी तपासण्यात आली होती. त्यावेळी डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले.
दिघी रोड भोसरी येथील अध्यक्ष प्रथमेश गोरख गवळी, उपाध्यक्ष आकाश गवळी असलेल्या मंडळाने डीजे लावून ध्वनी प्रदूषण केले. याप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह ट्रॅक्टर चालक हेमला चव्हाण, डीजे मालक अर्जुन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुयोग लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी मधील लोंढे आळी येथील मंडळाचा अध्यक्ष आर्यन विक्रम सपकाळ (२०, भोसरी), डीजे मालक प्रवीण विठ्ठल सावंत (वय ३८), ट्रॅक्टर चालक मालक गोपाळ राठोड (वय ४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतिश मरगळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश्य आवाजात डीजे वाजवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
भोसरी मधील शास्त्री चौक मंडळाचा अध्यक्ष स्वप्नील अशोक बुर्डे (२९, भोसरी), डीजे मालक दर्शन ओव्हाळ (३३), ट्रॅक्टर चालक मालक गोपाळ (४०, कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अतिश मरगळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.