File Photo : Bribe
गोंदिया : आरोग्य विभागात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याकडून प्रोत्साहन भत्त्याची रक्कम काढून देण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागून; अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लेखापालाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. 1) गोरेगाव पंचायत समितीत करण्यात आली.
लाचखोर लेखापालाचे नाव सुरेश रामकिशोर शरणागत (36) असे आहे. तक्रारदार महिला गोरेगाव तालुक्यातील चोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गिधाडी उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. त्या महिलेला 16 हजार 500 रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर झाला होता. ती रक्कम काढून देण्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागात, तालुका आरोग्य अधिकारी नियंत्रण पथकात कार्यरत कंत्राटी लेखापाल सुरेश रामकिशोर शरणागत याने त्या महिलेला तीन हजारांची लाच मागितली.
तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाकडे तक्रार केली. पडताळणीत लाच मागत असल्याची खात्री झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
तडजोडीअंती ठरलं 2500 देण्याचं
3 हजारांची जरी लाच मागितली असली तरी तडजोडीअंती 2500 रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या ‘या’ पक्षाचे भाजपसोबत झाले मतभेद; दौऱ्यालाही केला विरोध