हिंजवडीतील आयटी कंपनीकडून ४०० उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक (File Photo : Fraud)
वर्धा : लग्नाला पाच वर्षे पूर्ण होऊनही एका जोडप्याला अपत्यप्राप्ती झाली नाही. त्यात अपत्यप्राप्तीची अपेक्षा असलेल्या अशाच एका दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होईलच असे प्रलोभन देत गावागावात बैल घेऊन फिरणाऱ्या दोघांनी तब्बल २१ लाख ८९ हजारांनी गंडा घातला. ही घटना हिंगणघाट तालुक्याच्या गोविंदपूर येथे घडली.
या दाम्पत्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि.७) दोघांविरुद्ध तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला. गोविंदपूर येथील रहिवासी महेंद्र निवृत्ती सांबरे हे शेती करून उदरर्निवाह करतात. त्यांचा विवाह होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला. सांबरे दाम्पत्याला अपत्य झाले नाही. त्यामुळे ते नेहमीच विवंचनेत राहायचे. मूल व्हावे म्हणून त्यांनी उपचार केले. पण त्यांना बाळ झाले नाही. अशातच २५ जून २०२५ ला त्यांच्या गावात बैल घेऊन दारोदारी भिक्षा मागणारे दोघे व्यक्ती आले. त्यांनी महेंद्रच्या पत्नीला पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी पाणी दिले.
दरम्यान, झालेल्या चर्चेत सांबरे दाम्पत्याने विवाहाला पाच वर्षे होऊनही मुलबाळ झाले नसल्याचे बैल घेऊन गावात भिक्षा मागणाऱ्यांना सांगितले. त्यावर तुम्हाला पूजा करावी लागेल, पूजेनंतर तुम्हाला नक्कीच मूल होईल, असे सांगितले. पुजेसाठी त्यांनी सुरूवातीला सांबरे दाम्पत्याकडून ९ हजार रुपयांची रोख स्वीकारली.
पूजेच्या नावावर घेतले वारंवार पैसे
नंतर वारंवार पुजेच्या नावाखाली पैशाची मागणी केली. शेती विक्रीतून मिळालेले पैसे व दागिने त्या बैल घेऊन भिक्षा मागणाऱ्यांना दिले. रोख व दागिने असा २१ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल दिल्यावरही संबंधितांनी ३६ लाखांची मागणी केली. अशातच आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच सांबरे दाम्पत्याने हिंगणघाट पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. या प्रकरणी महेंद्र सांबरे यांच्या तक्रारीवरून दोन नंदीबैल वाल्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.