Cyber Crime : 'डिजिटल अरेस्ट'चा धक्कादायक फंडा; 6 बँकांमधील 43 खात्यांतले 2.12 कोटी ईडीने केले जप्त, सौजन्य : आयएएनएस
सप्टेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान सायबर ठगांनी स्वतःला TRAI, मुंबई क्राइम ब्रँच आणि CBIचे अधिकारी असल्याचे सांगून गुवाहाटीतील ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला. त्यांच्या आधारकार्डवर उघडलेले बँक खाते मनी लॉन्डरिंगमध्ये वापरले जात असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.
यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. बनावट न्यायालयीन कार्यवाही आणि बनावट ‘डिजिटल अरेस्ट वॉरंट’ दाखवून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. दर दोन तासांनी आपली उपस्थिती नोंदवण्यास सांगण्यात आले. तसेच कुणाला याबाबत माहिती दिल्यास ‘नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्याची धमकी देण्यात आली.
कुटुंबाच्या निधीची ‘RBI चौकशी’ आणि त्यानंतर बनावट ‘बेल बॉन्ड’ च्या नावाखाली पीडिताला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 19 व्यवहारांतून सुमारे 2.13 कोटी रुपये पाठवण्यास भाग पाडण्यात आले. ही रक्कम उभी करण्यासाठी पीडिताने फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड आणि शेअर्स विकले. तसेच पेन्शन खात्यावर आणि विमा पॉलिसीवर कर्जही घेतले.
ईडीच्या तपासात फसवणुकीची रक्कम प्रथम ‘म्यूल अकाउंट्स’मध्ये जमा करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर ही रक्कम देशभरातील विविध व्यक्ती, कंपन्या आणि फर्मच्या बँक खात्यांमध्ये वेगवेगळ्या भागांत वळवण्यात आली.
पैशांचा माग काढणे कठीण व्हावे यासाठी काही रक्कम रोख स्वरूपात काढण्यात आली, तर काही रक्कम डिजिटल करन्सीमध्ये रूपांतरित करण्यात आली. तसेच पेमेंट गेटवे आणि इतर बँक खात्यांमध्येही पैसे वळवण्यात आल्याचे तपासात आढळले.
‘भूत काढण्याच्या’ बहाण्याने अघोरी विधी; फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप
ईडीने पैशांच्या व्यवहाराचा माग काढत फसवणुकीच्या रकमेशी संबंधित 43 बँक खाती शोधून काढली. या खात्यांमध्ये शिल्लक असलेली सुमारे 2.12 कोटी रुपयांची रक्कम PMLAच्या कलम 5(1) अंतर्गत तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास ईडीकडून सुरू आहे.






