गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास
लता अनिल घुगे (वय ६६, रा. उंबरे कोठा, बार्शी नाका परिसर, धाराशिव) यांच्यासोबत २१ ऑक्टोबर रोजी ही फसवणूक झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. त्या घरी असताना अज्ञात व्यक्तींनी गॅस पाइपलाइन कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्याशी संपर्क साधला. त्यासाठी बनावट गॅस बिल अपडेट करण्याची प्रक्रिया असल्याचे भासवून संबंधित मोबाईल क्रमांकांवरून एपीके फाइल पाठविण्यात आली.
या प्रकारातून घुगे यांच्या बँक ऑफ इंडिया येथील खात्यातून एकूण ७ लाख ९६ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी २२ ऑक्टोबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.
अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या एपीके फाइल मोबाईलमध्ये डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नयेत.
गॅस कनेक्शन किंवा बिल अपडेट करण्याच्या नावाखाली आलेल्या संशयास्पद संदेशांची अधिकृत यंत्रणेकडून खात्री करावी.
बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा अन्य गोपनीय तपशील अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा आणि अधिकृत सायबर तक्रार नोंदवावी.
नक्की आपण खातोय काय? Pune शहरात ९ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा अन्…; FDA ची धडक कारवाई






