Nagpur News : दारू ढोसून पोलिसाची रुग्णालयातच दादागिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण, तीन टाकेही पडले (File Photo)
नागपूर : नेत्र विभागाच्या ओपीडी समोर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सिव्हिल पोशाखात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामध्ये जोरात गाणे वाजवून धिंगाणा घालणाऱ्या पोलिसाने चक्क मेडिकलमधील महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला गंभीर मारहाणही केली. मंगळवारी मध्यरात्री वॉर्ड क्रमांक 47 च्या खाली हा गंभीर प्रकार घडला.
मद्य प्राशन केलेला हा पोलिस स्वतःला शहराच्या सहपोलिस आयुक्तांचा ड्रायव्हर असल्याचे सांगत होता. इतक्यावरच तो थांबला नाही तर भलामोठा दगड घेऊन दुसऱ्या एका एमएसएफ जवानावर डोक्यात घालण्यासाठी धावला. याचवेळी प्रसंगावधान राखत मध्यस्थीसाठी आलेल्या जवानांनी त्याला रोखल्याने पुढील दुर्घटना टळली. यातील आणखी संतापजनक बाब म्हणजे या प्रकाराची अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी बुधवारी रात्रीपर्यंत त्याची कसलीही गंभीर दखल घेतली नाही, की गुन्हा दाखल केला की नाही याची देखील माहिती दिली नाही.
मंगळवारी मध्यरात्री वॉर्ड क्रमांक 47 च्या खाली काही जण मोठमोठ्याने गाणे वाजवत असल्याची तक्रार वॉर्डातील परिचारिकांनी एमएसएफ नियंत्रण कक्षाला केली होती. त्यानंतर काही जवान घटनास्थळी धावले असला तिथे हा प्रकार घडला. स्वतःला पोलिस असल्याचे सांगत धमकावणारा पोलिसच असा दारू ढोसून धिंगाणा घालत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांचे अभय का?
धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारा हा पोलिस स्वतःला शहराचे सहपोलिस आयुक्त इसार तांबोळी यांच्या वाहनावर चालक असल्याचे ओरडून सांगत होता. त्याचे व्हिडिओ चित्रण देखील काही जणांनी केल्याने पोलिसांचेच या ‘दादागिरी’ला अभय आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे.
सुरक्षारक्षकाच्या डोक्यात पडली खोच
या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जवानाच्या डोक्यात खोच पडली आहे. शुभम गायधनी असे पोलिसाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एमएसएफ जवानाचे नाव आहे. त्याच्या डोक्याला खोच पडल्याने तीन टाके घालण्यात आले आहेत. तर बादल कांबळे सुदैवाने बचावलेल्या दुसऱ्या एमएसफए जवानाचे नाव आहे.