नवी दिल्ली- तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या कविता (KCR Daughter K Kavita) यांच्यासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील मद्यघोटाळा प्रकरणात (Delhi liquor scam) ईडीने (ED) कविता यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. गुरुवारी ९ मार्ला कविता यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे. हे समन्स पाठवण्याच्या आदल्या दिवशी ईडीनं या प्रकरणात अरुण रामचंद्रन पिल्लई याला अटक केली आहे. अरुण पिल्लई हा कविता यांच्यासाठी बेनामी नावानं काम करत असल्याचा ईडीचा आरोप आहे. चौकशीनंतर ईडीकडून कविता यांनाही अटक करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
हैदराबादमधील एका व्यावसायिकाच्या साऊथ ग्रुपकडून १०० कोटी रुपयांची लाच आम आदमी पार्टीला पोहचवण्यासाठी पिल्लई यानं मध्यस्थी केल्याचा दावा ईडीनं केला आहे. सोमवारी रात्री पिल्लईला अटक करण्यात आली आणि मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टानं 13 मार्चपर्यंत पिल्लईची कोठडी केंद्रीय तपास यंत्रणांना दिलेली आहे. दिल्ली मद्यधोरण घोटाल्या प्रकरणातील ही आत्तापर्यंतची 11वी अटक आहे.
व्यावसायिक असलेला पिल्लई हा रॉबिन डिस्टिलरीज एलएलपी नावाच्या कंपनीत भागीदार असल्याचं सांगण्यात येतंय. तसचं पिल्लई हा केसीआर यांची मुलगी कविता आणि इतरांशी संबंधित असलेल्या मद्य कार्टल साऊथ ग्रुपशी संबंधित आहे, असा दावा ईडीनं केलेला आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले मद्य व्यावसायिक समीर महंद्रू, त्याची पत्नी गितिका महंद्रू आणि त्यांची कंपनी इंडोस्पिरिट ग्रुप याच्याशीही पिल्लई याचे संबंध असल्याचं सांगण्यात येतंय.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पिल्लई याची ईडीनं 11 वेळा चौकशी केली होती. सोमवारी चौकशीत सहकार्य करत नसल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. मद्य कार्टलसाठी कार्यरत असलेल्या साऊथ ग्रुपचे प्रतिनिधित्व अरुण पिल्लऊ, बुची बाबू आणि अभिषेक बोईनपल्ली करत होते, असं ईडीचं म्हणणं आहे. या प्रकरणी चुची बाबू आणि अभिषेक याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे.