मावळमधील ‘सोएक्स इंडिया प्रा. लि.’ कंपनीवर कारवाई हुक्का फ्लेवर्ड तंबाखू उत्पादनावर FDA ची धाड (फोटो - टीम नवराष्ट्र)
Pune Crime News : वडगाव मावळ : सतिश गाडे : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली. FDA ने मावळ तालुक्यातील टाकवे गाव येथील मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीवर धाड टाकली (Crime News). या कारवाईत तब्बल ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून संपूर्ण आस्थापना सील करण्यात आली आहे.
ही कारवाई दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजता FDA च्या विशेष भरारी पथकाने केली. सहायक आयुक्त (अन्न) भंडारा पथक प्रमुख यदुराज दहातोंडे यांच्या आदेशानुसार ही तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान सहायक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी व पंच साक्षीदार उपस्थित होते.
हे देखील वाचा : इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट; पुण्यातून अजित पवारांची नाराजी व्यक्त
निकोटीन आढळल्याने उत्पादन बेकायदेशीर
यापूर्वी १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या हुक्का फ्लेवर्ड तंबाखूच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटीन आढळून आले. हे उत्पादन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले. अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार हे उत्पादन अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ तसेच आयुक्त, अन्न सुरक्षा, महाराष्ट्र राज्य यांच्या १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेचे उल्लंघन करणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
५.४८ लाख किलो साठा जप्त
टाकवे येथील आस्थापनेत तपासणीदरम्यान तंबाखू, ग्लिसरीन, फ्रुक्टोज, साखर सिरप तसेच विविध फ्लेवर्स वापरून ‘Afzal Authentic Flavoured Hookah’ या नावाने उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत एकूण ५,४८,४८८ किलो वजनाचा साठा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ११६ प्रकारचे तयार पदार्थ, १८ प्रकारचा कच्चा माल, १८ प्रकारचे फ्लेवर्स यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात ठरले दोषमुक्त
आस्थापना सील; FIR दाखल
कारवाईनंतर संपूर्ण आस्थापना सील करून चाव्या FDA च्या ताब्यात देण्यात आल्या. याप्रकरणी अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर), संचालक असिफ फाजलानी, फैजल फाजलानी व कंपनी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका
मानवी सेवनासाठी अपायकारक व राज्यात पूर्णतः बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्याने सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याचे FDA अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यभर अशा प्रतिबंधित पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचा सहव्यवस्थापक अनिल चौहान यास अटक करण्यात आली असून त्याला वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस दिनांक ८ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली






