फोटो- istockphoto
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ज्यात ज्यादा परताव्याच्या आमिषाने फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. असे असताना आता शहरातील विविध हॉटेल्सला रेटींग दिल्यास चांगले कमिशन देण्याची बतावणी करुन महिलेला तब्बल 49 लाखांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
संबंधित महिला ही एका खाजगी कंपनीत वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहे. या महिलेची 49 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मोहम्मद इसरार अब्ररार या आरोपीला दिल्लीतून सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून, याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील स्थानिक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. मोहम्मद इसरारने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती परविल्याचा आरोप आहे.
पार्टटाईम जॉबची ऑफर
श्रुती अरुण दिवाकर ही मूळची सांताक्रूझ येथे तिच्या मैत्रिणीसोबत राहते. एका खाजगी कंपनीत ती वरिष्ठ सल्लागार म्हणून कामाला आहे. 9 मार्चला तिला प्रिती शर्मा नावाच्या एका महिलेचा कॉल आला होता. तिला पार्टटाईम जॉबची ऑफर देताना तिला दिवसाला एक हजार मिळतील असे सांगितले.
हॉटेल्सना रेटींगचे दिले काम
डेमो म्हणून तिने तिला गुगलवर जाऊन 20 हॉटेल्सना रेटींग देण्याचे काम दिले होते. त्यामुळे तिने हॉटेल्सना रेटींग दिले होते. प्रत्येक रेटींगमागे तिला 50 रुपये मिळाले होते. ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली होती. यावेळी प्रितीने दिवसभरात व्यवस्थित रेटींग दिल्यास तिला दिवसाला साडेआठ हजार रुपये मिळतील, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला होता.
विविध प्रिपेड टास्क
9 मार्च ते १३ मार्च २०२४ या या कालावधीत तिने 49,28,175 रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर तिला २९ हजार ७०० रुपयांचे कमिशन देण्यात आले होते. मात्र, उर्वरित पैशांसह कमिशनची मागणी करुन तिला समोरुन काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने मारिया नावाच्या महिलेशी संपर्क साधून तिच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मारियाने तिला 19 लाख 70 हजार रुपये भरले तर तिचे सर्व पैसे तिच्या बँक खात्यात जमा होतील, असे सांगितले. मात्र, आणखी पैसे भरण्यास नकार दिला आणि प्रकार उघडकीस आला.
दिल्लीतून घेतले ताब्यात
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरून एक टीम दिल्लीला गेली होती. या पथकाने दिल्लीचा रहिवाशी असलेल्या मोहम्मद इसरार अबरार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याच बँक खात्यात साडेतीन लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. ही रक्कम त्याने एटीएममधून काढून त्याच्या दुसऱ्या सहकार्याला दिले होते. याकामी त्याला काही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते.
पोलिसांनी दिल्लीतून आणले मुंबईत
या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक करून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर सहकाऱ्यांचे नाव समोर आले असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.