नोकरीचे आमिष तब्बल 6 लाखांची फसवणूक; टेलिग्राम अॅपवर ती जाहिरात पाहिली अन्...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. विविध मार्गांनी फसवणूक केली जात आहे. असे असताना टेलिग्राम अॅपवर नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 6 लाख 9 हजार 884 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी तरुणाला अटक केली आहे.
एका सायबर गुन्हेगाराला ओशिवरा पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे गोवा येथून या प्रकरणात आरोपी असलेल्या अमन पास्कर परमार याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तक्रारदार नगानी यांना जून 2025 मध्ये ‘विजय’ नावाच्या व्यक्तीने टेलिग्राम अॅपवरून संपर्क केला होता. विजयने त्यांना एका लिंकवर माहिती भरायला लावली व ऑनलाईन रेस्टॉरंट रेटिंगचे काम देण्याचे आमिष दाखवले.
हेदेखील वाचा : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
या कामात असताना सुरुवातीला थोडा परतावा मिळाल्याने त्यांनी यावर विश्वास ठेवला. मात्र, नंतर बोगस बँक व्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये उकळण्यात आले. नगानी यांच्या तक्रारीवरून मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपीने वापरलेलं येस बँकेचं खाते ट्रेस केले. त्यानंतर त्या खात्यातील व्यवहार, मोबाईल नंबर आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले.
आरोपीला गोव्यातून घेतले ताब्यात
या तांत्रिक तपासातून आरोपीचा लोकेशन गोव्यातील कांडोलिम परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पथकाने गोव्यात सर्च ऑपरेशन राबवत मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आरोपी अमन पास्कर परमार याला अटक केली.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २४ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकऱणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.