फोटो सौजन्य - सोशल मि़डीया
रोहित पवार यांनी हर्षल पाटील यांच्या मृत्यूला केवळ आत्महत्या न म्हणता, ‘सरकारने केलेला खून’ असे संबोधले आहे. कंत्राटदारांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, राज्यातील कंत्राटदारांची तब्बल ९० हजार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. सुरुवातीला हर्षल पाटील यांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेवर मिळत होते. मात्र, त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘पैसे नाहीत’ असे सांगण्यात येत होते, असा दावा पवार यांनी केला आहे. छोट्या कंत्राटदारांना या आर्थिक अडचणीचा मोठा फटका बसत असून, कामासाठी घेतलेले कर्ज, मजुरांचे पैसे, साहित्य खरेदी आणि इतर खर्च भागवताना त्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल
सरकारकडून विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असताना विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांची बिले मात्र प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. निवडणुका जिंकण्यासाठी विविध योजनांची घोषणा केली जाते; मात्र प्रत्यक्ष विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या थकीत बिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यात सुमारे एक लाख कंत्राटदार असून त्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. कंत्राटदारांची थकीत बिले तातडीने अदा करावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हर्षल पाटील यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानेही संताप व्यक्त केला. शासनाकडून वेळेवर बिले न मिळाल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शासकीय कामांची बिले मंजूर होऊनही ती प्रत्यक्षात कंत्राटदारांच्या खात्यावर जमा होण्यासाठी लागणारा वेळ, निधीची उपलब्धता आणि विभागीय पातळीवरील प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारने थकीत बिलांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून कंत्राटदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
रोहित पवार यांनीही थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणी करत सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.






