लाचखोर जीएसटी अधिकारी निलंबित (संग्रहित फोटो)
नाशिक : राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. सरकारी काम करून देण्यासाठी ही लाच अधिकाऱ्यांकडून घेण्यात येते. अशाच एका प्रकरणात एका उद्योजकाकडून ५० लाखांची मागणी करुन २२ लाख रूपयात तडजोड करत ५ लाख रुपये लाच स्वीकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधिक्षकास निलंबित करण्यात आले आहे. इतकेच नाहीतर त्यांचे बँक खाते व मालमत्ता यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयकडून आता तयारी केली जात आहे.
जिल्ह्यातील एका उद्योजकाकडून जीएसटीत अनियमितता केली, अशी भीती तथ्यहीन अर्जाच्या आधारे दाखवण्यात आली. यामध्ये ५० लाख रुपयांची मागणी सेंट्रल जीएसटी अधिक्षक हरी प्रकाश शर्मा यांनी केली होती. मात्र, तडजोडीअंती २२ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यापैकी १४ ऑक्टोबरला उद्योजकाकडून ५ लाख रुपये रोख लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून शर्मा यास जेरबंद केले.
गुन्हा दाखल करुन त्यास गजाआड टाकल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर विशेष न्यायालयाने युक्तिवाद ऐकून शर्माची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शर्मासोबत आलेल्या तीन निरीक्षकांची चौकशी प्रलंबित आहे. दरम्यान, भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, राजस्व विभाग, केंद्रीय वस्तू व सेवा कर तथा केंद्रीय उत्पादन शुल्क,आयुक्त कार्यालय नाशिक या कार्यालयाचे आयुक्त प्रदिप गुरुमुर्ती यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन लाचखोर हरी प्रकाश शर्मा याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
शर्मा याच्या विरोधात सीबीआयकडे एफआयआरनुसार पुणे सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल गुन्ह्यात अटक केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. आता ४८ तास यास पूर्ण झाले, असे पत्र सीबीआय इन्फॉर्मेशन विभागाकडून रिलीज झाले. त्याआधारे शर्मा यास संबधित कलमान्वये निलंबित करण्यात आले आहे.
आयुक्तांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी
नाशिक येथील मुख्यालय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय सोडू नये, असे स्पष्ट आदेशात नमूद करण्यात आले आहे. आयुक्त प्रदिप गुरुमुर्ती यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी पूर्ततेस सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : 20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले