Nashik Crime The Deputy Sarpanch Brutally Murdered His Wife While Intoxicated
Nashik Crime: नाशिकमध्ये थरार! उपसरपंचाने दारूच्या नशेत पत्नीची केली निर्घृण हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक जिल्ह्यातील गावात उपसरपंच जयराम पवार याने दारूच्या नशेत झोपेत असलेल्या पत्नी जिजाबाई पवार यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
कळवण तालुक्यात उपसरपंचाकडून पत्नीची झोपेत असताना हत्या
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने आत्महत्येचा प्रयत्न
लोकप्रतिनिधी आरोपी निघाल्याने गावात व तालुक्यात संतापाची लाट
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत गावातील उपसरपंचाने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. यानंतर आरोपी पतीने स्वतःही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव उपसरपंच जयराम पवार असे आहे. तर मृतकाचे नाव जिजाबाई पवार असे आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयराम पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई पवार यांच्यात दारूच्या नशेतून घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला. याच वादानंतर जिजाबाई पवार झोपी गेली. त्या दरम्यान आरोपी पतीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करत त्यांची हत्या केली. हल्ला इतका गंभीर होता की जिजाबाई पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने स्वतः कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना माहिती होताच तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास कळवण पोलीस करत आहे.
वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन
नाशिक येथील सिडको परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तरुणाचे नाव शुभम बाळासाहेब व्यापारी(सिडको परिसरातील दत्त चौक, लक्ष्मीनगर, महाले फार्म) असे आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचं अपघाती निधन झालं होत. त्यानंतर शुभमने खांडे मळा परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.