संग्रहित फोटो
पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच घेताना लोणावळा शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. शकील मोहम्मद शेख (वय ४५, रा. लोणावळा) असे पकडलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शकील शेख पुणे ग्रामीण पोलीस दलात कर्तव्यास आहेत. ते लोणावळा शहर पोलिस ठाण्याअंतर्गत नारायणीधाम पोलिस चौकीत कर्तव्य बजावतात. दरम्यान, ४२ वर्षीय तक्रारदार यांच्यावर लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास शकील शेख हे करत आहेत. दरम्यान, तक्रारदारांना दाखल गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी शकील शेख यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार, सोमवारी सापळा कारवाईत शेख यांना तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली आहे.
हे सुद्धा वाचा : आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत
गेल्या काही महिन्याखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले.