Photo Credit- Social media इंदापूरच्या भिगवणमध्ये महिला सरपंचाला शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी
इंदापूर : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं असतानाच काल बीडमध्ये पुन्हा एका सरपंच तरूणाचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणाला काही तास उलटत नाहीत तोच
तक्रारवाडी येथे अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला सरपंचाला अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) तक्रारवाडीत घडली असून, सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, पोलिसांनी अनिल शामराव वाघ, गौरव अनिल वाघ आणि अशोक शामराव वाघ यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, विनयभंग, शिवीगाळ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महिला सरपंच मनीषा वाघ या बुधवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाकडे जात असताना ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १४०१ मध्ये अतिक्रमण करून शेड उभारण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ग्रामसेवक शोभा जाधव यांच्यासह चौकशी सुरू केली असता, अनिल वाघ याने हे शेड आपले असल्याचे सांगितले. सरपंचांनी ही सरकारी जागा असल्याचे सांगून कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यावरून अनिल वाघ यांनी सरपंचांना अश्लील शिवीगाळ केली. उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गौरव वाघ व अशोक वाघ यांनी भिगवणमधील आंबेडकर चौकात सरपंचाच्या पतीला शिवीगाळ करत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.तक्रारवाडीतील परिस्थिती गंभीर असून, कुटुंबाला धोका असल्याचा आरोप मनीषा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांचे पती प्रशांत वाघ यांनी या घटनेमागील ‘मास्टरमाइंड’चा शोध घेण्याची मागणी केली आहे.
भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ आणि विनयभंग यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण असून, सरपंच वाघ यांनी ग्रामपंचायतीची अधिकृत जागा वाचवण्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.