संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारजे माळवाडी परिसरात लाँन्ड्री व्यावसायिकाकडे महिन्याला पाच हजार रुपये हप्त्याची मागणी करुन दुकानाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सराइतावर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सराइताने परिसरात दहशत देखील माजवली. नंतर कारची काच फोडली. याप्रकरणी ओंकार उर्फ खंड्या वाघमारे (वय २१, रा. रामनगर, वारजे) याच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका लाँन्ड्री व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराचे एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात दांगट पाटीलनगर इस्त्री आाणि कपडे धुलाईचे दुकान आहे. आरोपी वाघमारे हा तीन दिवसांपूर्वी शिवणे भागात आला. त्याच्याकडे गज होता. ‘या भागाचा मी दादा आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’, अशी धमकी त्याने व्यावसायिकाला दिली. पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भागातील एका कारची काच फोडली.
हे सुद्धा वाचा : एक कार भरधाव वेगात आली अन् टिळक रस्त्यावरील…; वाचा ‘ही’ धक्कादायक घटना
शिवणे भागातील दांगट पाटीलनगर परिसरात लघुउद्योजकांचे कारखाने आहेत. या भागातील आणखी एका व्यावसायिकाला त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. त्याने कारखाना पेटवून देण्याची धमकी दिली. मी पोलिसांना घाबरत नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला. घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भरसट तपास करत आहेत.
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.