संग्रहित फोटो
पुणे : पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. शनिवार पेठ पोलीस चौकीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अथर्व रामचंद्र जोशी (वय २२, रा. विश्वकमल काॅम्प्लेक्स, नारायण पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई प्रसाद ठाकूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नववर्षाच्या मध्यरात्री एकच्या सुमारास दुचाकीस्वार अथर्व भरधाव वेगात निघाला होता. त्यावेळी त्याने एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. अपघातात महिलेच्या दुचाकीचे नुकसान झाले. नंतर महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बंदोबस्तावरील पोलिसांनी अथर्वला ताब्यात घेतले. त्याला शनिवार पेठ पोलीस चौकीत नेले. तेव्हा त्याने पोलीस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; ‘या’ भागात बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला
पोलीस चौकीत त्याने तक्रारदार महिलेसह पोलिसांना शिवीगाळ केली. पोलीस शिपाई ठाकूर आणि इनामदार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी अथर्ववर गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करत आहेत.
थर्टी फस्टच्या दिवशी ८५ जणांवर कारवाई
नववर्षाचे स्वागत तसेच सरत्या वर्षाला निरोप देणाऱ्या पुणेकरांच्या सुरक्षेसाठी शहरात साडेतीन हजार पोलीस कर्मचारी, सातशे वाहतूक अंमलदारांचा बंदोबस्तावर होते. तर २७ महत्त्वाच्या ठिकाणी मद्यपी वाहनचालकांवर कारवाईसाठी नाकाबंदी केली होती. शहरात गेल्या वर्षभरात (२०२४) ५२६२ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये दर दिवशी सरासरी १४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. त्यातुलनेत ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ८५ वाहन चालकांवर कारवाई केली आहे.
शिविगाळ केल्याचे अनेक प्रकार उघडकीस
दरम्यान पुण्यात पोलिसांना धक्काबुकी आणि शिविगाळ केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. गेल्या काही दिवसाखाली पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात फेरी (रुट मार्च) काढण्यात येत होता. पर्वती पोलिसांकडून गुरुवारी सायंकाळी जनता वसाहत भागातून रुट मार्च काढण्यात आला. रुट मार्चमध्ये पर्वती पोलीस ठाण्यातील ७ पोलिस अधिकारी, ४३ पोलिस कर्मचारी आणि सीमा सुरक्षा दलाची (बाॅर्डर सिक्युरिटी फोर्स) एक तुकडी, पोलिसांची वाहने सहभागी झाली होती. परतीच्या मार्गावर जनता वसाहत परिसरातील गल्ली क्रमांक १०८ च्या दिशेने रिक्षाचालक चौधरी निघाला होता. पोलीस कर्मचारी खाडे आणि सुर्वे यांनी पोलिसांचे वाहन जाण्यासाठी त्याला रिक्षा रस्त्याच्या कडेला लावण्याची विनंती केली. त्याने रिक्षा बाजूला न घेता रस्त्यामध्ये आडवी लावली. रस्ता अडवून त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्याला समजावून सांगितले. पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालक चौधरीने आरडाओरडा केला. तेव्हा परिसरातील रहिवासी तेथे जमले. चौधरीला पोलीस कर्मचारी कांबळे यांनी समजावून सांगिले. रिक्षा बाजूला काढण्यास सांगितले. तेव्हा त्याने कांबळेंना धक्काबुक्की केली. चौधरीची पत्नी आणि आईने पोलिसांना दगड भिरकावून मारला. महिला पोलिसांनी दोघींना समजावून सांगितले. तेव्हा दोघींनी महिला पोलिसांच्या हाताचा चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौधरीला अटक करण्यात आली.